
पुणे जिल्ह्यातील दौंड शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि पोलिसांच्या जरबेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना समोर आली आहे. चक्क दौंड पोलीस ठाण्याच्या पार्किंगमध्येच एका ३० वर्षीय तरुणावर कोयता आणि लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला करण्यात आला. तक्रार देण्यासाठी आलेल्या तरुणाला गाठून आरोपींनी हा राडा केला असून, या प्रकरणी पोलिसांनी १२ जणांवर खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.

दौंड पोलीस स्टेशनच्या परिसरात सोमवारी (२७ एप्रिल) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मयुर पोपट सुळ (वय ३०, रा. गोपाळवाडी, ता. दौंड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. मयुर हे आरोपींविरुद्ध तक्रार देण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांसह पोलीस ठाण्यात आले होते, मात्र आरोपींनी तिथेच त्यांना गाठले.

नेमकी घटना काय घडली?
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मयुर सुळ हे संकेत राजू होले आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचले होते. ते पोलीस ठाण्याच्या बाजूला असलेल्या पार्किंगमध्ये उभे असतानाच आरोपींनी तिथे येऊन त्यांना घेरले. सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली, त्यानंतर आरोपी संकेत होले याने “ठार मारा” अशी चिथावणी दिल्याने हल्ल्याला सुरुवात झाली.
आरोपी शेखर झोरे याने मयुर यांना धक्का देऊन जमिनीवर पाडले, तर संकेत होले याने हातातील कोयत्याने थेट मयुर यांच्या गळ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. मयुर यांनी समयसूचकता दाखवत वार चुकवल्याने तो त्यांच्या डोक्याला लागला. त्यानंतर साजन गिरमे याने लोखंडी रॉडने कमरेवर प्रहार केला, तर इतर आरोपींनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह:
ज्या ठिकाणी सर्वसामान्यांना सुरक्षा मिळणे अपेक्षित आहे, त्याच पोलीस ठाण्याच्या आवारात असा खुनी हल्ला झाल्याने दौंड शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. गुन्हेगारांचे धाडस इतके वाढले आहे का? असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत.
यांच्यावर झाला गुन्हा दाखल:
मयुर सुळ यांच्या तक्रारीवरून दौंड पोलिसांनी खालील आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार खुनाचा प्रयत्न आणि दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे:
१. प्रतिक महादेव होले
२. संकेत राजू होले
३. राजु दिनकर होले
४. ऋषीकेश रमेश होले
५. साजन गिरमे
६. शेखर झोरे
७. श्रीनाथ सोपान होले
८. गोरख बनकर
९. संदिप छगन होले
आणि इतर ३ ते ४ अनोळखी साथीदार.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बिद्री करीत आहेत.










