चिमुरडीवर अत्याचार करून मृतदेह शेणात लपवला; भोरमध्ये संतापाची लाट

एकीकडे संपूर्ण राज्य १ मे रोजी ‘महाराष्ट्र दिन’ साजरा करण्यात आणि राज्याच्या विकासाच्या गप्पा मारण्यात मग्न असताना, दुसरीकडे पुण्याच्या भोर तालुक्यातून माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत भीषण घटना समोर आली आहे. एका ६५ वर्षांच्या विकृत नराधमाने अवघ्या ४ वर्षांच्या चिमुरडीवर पाशवी अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात हे अघोरी कृत्य घडले आहे. पीडित ४ वर्षांची चिमुरडी शाळेला सुट्ट्या लागल्यामुळे आपल्या आजीकडे राहायला आली होती. घरासमोर खेळत असताना गावातीलच एका ६५ वर्षीय नराधमाची तिच्यावर वाईट नजर पडली. त्याने संधी साधून या चिमुरडीला उचलले आणि जवळच असलेल्या एका गोठ्यात नेले.

अत्याचार करून पुराव्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न

या नराधमाने गोठ्यात चिमुरडीवर अत्याचार केला. आपले हे दुष्कृत्य कोणासमोर येऊ नये आणि चिमुरडीने कोणाला काही सांगू नये, या भीतीने त्याने क्रूरतेचा कळस गाठला. त्याने चिमुरडीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली. एवढ्यावरच न थांबता, पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने या चिमुरडीचा मृतदेह गोठ्यातील शेणाच्या ढिगाऱ्याखाली दाबून ठेवला आणि तेथून पसार झाला.

सीसीटीव्ही फुटेजमुळे नराधम उघड

दुपार उलटून गेली तरी मुलगी घरी परतली नाही, म्हणून कुटुंबीयांनी तिची शोधाशोध सुरू केली. अख्खं गाव तिला शोधत होतं, मात्र ती कुठेच सापडत नव्हती. अखेर संशय आल्याने परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. यामध्ये तो ६५ वर्षांचा आरोपी चिमुरडीला गोठ्याच्या दिशेने घेऊन जाताना स्पष्टपणे दिसला. गावकऱ्यांनी तातडीने गोठ्याकडे धाव घेतली असता, शेणाच्या ढिगाऱ्याखाली त्या निरागस चिमुरडीचा मृतदेह आढळला. हे दृश्य पाहून उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला.

गावात तणावाचे वातावरण, नराधमाला फाशी देण्याची मागणी

ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली आणि नसरापूर परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. संतप्त गावकऱ्यांनी पोलीस ठाण्यावर धाव घेतली असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. “एकीकडे राज्य प्रगतीकडे जात असताना अशा विकृत लोकांमुळे माता-भगिनी आणि लहान मुली सुरक्षित आहेत का?” असा संतप्त सवाल विचारला जात आहे.भोर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वेगाने सुरू आहे. महाराष्ट्र दिनी घडलेल्या या कृत्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.