
पुण्यातील गजबजलेल्या हडपसर गाडीतळ परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून, बसमध्ये चढणाऱ्या एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील ३ लाख रुपये किमतीचे सोन्याचे गंठण चोरट्यांनी लंपास केले आहे. १५ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला असून, या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

नेमकी घटना काय?

पुष्पा एकनाथ ननावरे (वय ६८, रा. उन्नतीनगर, हडपसर) या आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी वारजे माळवाडी येथे जाण्यास निघाल्या होत्या. हडपसर गाडीतळ येथील बस स्टॉपवर बसमध्ये चढत असताना प्रवाशांची मोठी गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण अत्यंत शिताफीने हिसकावून नेले.
बसमध्ये चढताच बसला धक्का!
ननावरे या बसमध्ये चढल्यानंतर काही वेळातच त्यांना आपल्या गळ्यातील गंठण नसल्याचे जाणवले. त्यांनी तातडीने बसमध्ये आणि परिसरात शोध घेतला, मात्र चोरटा गर्दीत पसार झाला होता. त्यांनी लगेच आपला मुलगा दत्तात्रय ननावरे यांना बोलावून घेतले आणि हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
३ लाखांहून अधिकचा ऐवज लंपास
चोरीस गेलेल्या २० ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांची किंमत सध्याच्या बाजारभावानुसार ३ लाख रुपयांहून अधिक आहे. भरदिवसा आणि गजबजलेल्या ठिकाणी झालेल्या या चोरीमुळे हडपसर पोलिसांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
पोलिसांकडून तपास सुरू
याप्रकरणी हडपसर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलीस हवालदार गायकवाड अधिक तपास करत आहेत.










