
राज्यात सध्या नसरापूर आणि पर्वती येथील अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमुळे संतापाची लाट उसळलेली असतानाच, अकोला जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणारी बातमी समोर आली आहे. पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका ६० वर्षीय वृद्धाने शेजारी राहणाऱ्या अवघ्या १० वर्षांच्या चिमुकलीवर वारंवार अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित चिमुकलीचे आई-वडील शेतात मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आई-वडील कामासाठी घराबाहेर पडताच, शेजारी राहणाऱ्या ६० वर्षीय नराधम वृद्धाचा ‘हैवान’ जागा व्हायचा. गेल्या ४ ते ५ दिवसांपासून हा नराधम या चिमुकलीवर वारंवार अत्याचार करत होता.
मुलीने सांगितली आपबिती
नराधमाच्या धाकामुळे पीडित मुलगी सुरुवातीला काहीही बोलत नव्हती. मात्र, सततच्या त्रासामुळे ती घाबरलेली होती. आई-वडिलांना संशय आल्याने त्यांनी तिला विश्वासात घेऊन विचारणा केली असता, तिने तिच्यासोबत घडलेला हा भीषण प्रकार रडत रडत सांगितला. हे ऐकताच पालकांच्या पायाखालची जमीन सरकली.
आरोपी फरार, पोलिसांकडून शोध सुरू
याप्रकरणी चान्नी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून, आरोपी वृद्धावर पोक्सो (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच आरोपी फरार झाला असून, त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी तीन पथके रवाना केली आहेत.










