छत्रपती संभाजीनगरमध्ये ८० वर्षांच्या वृद्ध आजीवर २८ वर्षांच्या नराधमाचा अत्याचार

राज्यात दिवसेंदिवस महिला, तरुणी आणि लहान मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनत चालला आहे. कुठे ना कुठे महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. हे कमी म्हणून की काय, आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातून माणुसकीला पूर्णपणे काळीमा फासणारी एक अत्यंत घृणास्पद घटना समोर आली आहे. पाचोड येथील कल्याणनगर परिसरात एका २८ वर्षांच्या विकृत नराधमाने चक्क ८० वर्षांच्या वृद्ध आजीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

वादळी वाऱ्याचा घेतला गैरफायदा; मदतीच्या बहाण्याने घरात नेले

मिळालेल्या माहितीनुसार, पैठण तालुक्यातील पाचोड येथील कल्याणनगर परिसरात पीडित ८० वर्षीय आजी राहतात. सोमवारी दुपारच्या सुमारास या भागात अचानक जोरदार वादळी वारा सुटला होता. वयोमानामुळे या वादळी वाऱ्यात आजीला नीट चालता येत नव्हते आणि त्या तिथेच अडकल्या होत्या. त्याच वेळी तिथून जाणाऱ्या रोहन आहेर (वय २८ वर्ष) या विकृत तरुणाची नजर या असहाय्य आजीवर पडली.

आजीची हतबल स्थिती पाहून तिच्याबद्दल सहानुभूती दाखवण्याऐवजी रोहनने तिचा गैरफायदा घेण्याचे ठरवले. त्याने आजीला “मी तुम्हाला सुरक्षित घरी सोडण्यास मदत करतो,” असे सांगितले. आजीलाही या कठीण प्रसंगात त्याचा मोठा आधार वाटला. मात्र, या मदतीच्या बहाण्यामागे किती भयानक आणि क्रूर कट दडला आहे, याची पुसटशी कल्पनाही त्या वृद्ध आजीला नव्हती. तो आजीला आधार देण्याच्या बहाण्याने आपल्या घरात घेऊन गेला.

आजीचा आरडाओरडा आणि नागरिकांची सतर्कता

घरात नेल्यानंतर नराधम रोहनने आजीसोबत बळजबरी करण्यास सुरुवात केली आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या अनपेक्षित आणि भयानक प्रसंगामुळे घाबरलेल्या आजीने जीवाच्या आकांताने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. नशीब बलवत्तर म्हणून आजीचा हा आवाज परिसरातील नागरिक आणि महिलांच्या कानावर पडला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी तात्काळ रोहनच्या घराच्या दिशेने धाव घेतली. घरात शिरून लोकांनी रोहन आहेर या नराधमाच्या तावडीतून त्या वृद्ध आजीची सुटका केली.

पोलिसात गुन्हा दाखल, पुढील तपास सुरू

या धक्कादायक प्रकारानंतर नागरिकांनी तात्काळ आजीच्या नातेवाईकांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली. नातेवाईक घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी आजीला सोबत घेऊन पाचोड पोलीस ठाणे गाठले. पीडित आजीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी रोहन आहेर याच्याविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राम बारहाते करत आहेत.८० वर्षांच्या वृद्ध आणि असहाय्य आजीवर झालेल्या या अत्याचारामुळे समाजात नेमकी कोणती विकृती पसरत चालली आहे, असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिकांमधून विचारला जात आहे.