कात्रजमध्ये २ भिंतीत अडकलेल्या ७ वर्षीय मुलाची सुखरूप सुटका

कात्रजमधील जांभूळवाडी परिसरात मंगळवारी (दि. ५) दुपारी काळजाचा ठोका चुकवणारी एक घटना घडली. खेळता-खेळता दोन भिंतींच्या अत्यंत अरुंद फटीत अडकलेल्या एका ७ वर्षीय चिमुरड्याला अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून मृत्यूच्या दारातून सुखरूप बाहेर काढले. जवानांच्या या कामगिरीमुळे परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

नेमकी घटना काय?
जांभूळवाडी रोडवरील ‘गोविंद बेसिल’ सोसायटीमध्ये दुपारी ३:०९ वाजता रणवीर चेतन चव्हाण (वय ७ वर्षे) हा मुलगा खेळत होता. खेळण्याच्या नादात तो अचानक दोन भिंतींच्या अत्यंत अरुंद अशा बोळात पडला आणि तिथेच अडकला. मुलाला हालचाल करणेही कठीण झाले होते, ज्यामुळे तो प्रचंड घाबरला होता.

अग्निशमन दलाचे ‘रेस्क्यू ऑपरेशन’
घटनेची माहिती मिळताच कात्रज अग्निशमन केंद्राचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मुलाची अडकलेली स्थिती अत्यंत गंभीर होती. जवानांनी वेळ न घालवता अत्यंत सावधगिरीने हॅड्रोलिक ब्रेकर आणि घनाच्या साहाय्याने भिंत तोडण्यास सुरुवात केली. तसेच, भिंतीतील लोखंडी सळ्या अडथळा ठरत असल्याने बोल्ट कटरच्या साहाय्याने त्या कट करून रणवीरला सुखरूप बाहेर काढण्यात आले.

या जवानांनी लावली प्राणाची बाजी
प्रभारी उपअग्निशमन अधिकारी संतोष भिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली फायरमन किरण पाटील, मयूर काटे, प्रशांत कुंभार आणि ड्रायव्हर बंडू गोगावले यांनी हे बचावकार्य यशस्वी केले. मुलाची सुखरूप सुटका होताच पालकांनी आणि उपस्थित नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.