
छत्रपती संभाजीनगर शहरातून एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका विकृत पित्याने आपल्याच अवघ्या ५ वर्षांच्या निष्पाप चिमुरड्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. या नराधम बापाच्या विकृतीमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी पीडित बालकाच्या ३२ वर्षीय मातेने सातारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी नराधम पित्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

गच्चीवरून खाली फेकून देण्याची द्यायचा धमकी!

मिळालेल्या माहितीनुसार, हे पीडित कुटुंब मूळचे परभणी जिल्ह्यातील रहिवासी असून सध्या छत्रपती संभाजीनगर येथील एका गृहप्रकल्पात वास्तव्यास आहे. सन २०२५ पासून फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आरोपी पित्याने हे घृणास्पद कृत्य केले. घरात कोणीही नसताना, वेगवेगळ्या वेळी त्याने आपल्याच पोटच्या निष्पाप मुलाला वासनेचा बळी बनवलं.हे क्रूर कृत्य इथेच थांबले नाही; जर हा प्रकार कोणाला सांगितला किंवा आईला काही माहिती दिली, तर इमारतीच्या गच्चीवरून खाली फेकून देण्याची धमकीही या नराधमाने चिमुरड्याला दिली होती. बापाच्या या क्रूर धमकीमुळे आणि दहशतीमुळे तो ५ वर्षांचा बालक प्रचंड घाबरलेला होता.
वाढदिवसाच्या दिवशीच फुटला भांडाफोड
या सततच्या अत्याचारामुळे आणि भीतीमुळे चिमुरड्याच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम झाला होता. अलीकडेच या बालकाचा वाढदिवस होता. घरात वाढदिवसामुळे आनंदाचे वातावरण असताना, तो चिमुरडा अचानक अत्यंत गंभीर, घाबरलेला आणि अबोल झाला. मुलाची ही बदललेली वर्तणूक पाहून आईला संशय आला. तिने मुलाला जवळ घेतले आणि अत्यंत विश्वासाने विचारपूस केली.त्यावेळी त्या ५ वर्षांच्या निष्पाप मुलाने पित्याने केलेल्या अत्याचाराचा अंगावर काटा आणणारा सर्व प्रकार रडत-रडत आईला सांगितला. पोटच्या मुलावर स्वतःच्या पतीनेच असा अनन्वित अत्याचार केल्याचे ऐकून मातेच्या पायाखालची जमीनच सरकली.
शिवसैनिकांच्या मदतीने पोलिसात धाव, गुन्हा दाखल
या धक्कादायक प्रकारानंतर पीडित महिलेने तात्काळ शिवसैनिकांशी संपर्क साधून मदत मागितली. शिवसैनिकांच्या मदतीने या मातेने सातारा पोलीस ठाणे गाठून पोलिसांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. याप्रकरणी पोलिसांनी नराधम पित्याविरुद्ध विविध गंभीर कलमान्वये आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.या घटनेने बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, समाजात अशा विकृत मानसिकतेच्या व्यक्तींबद्दल तीव्र संतापाची लाट उसळली आहे.










