२३ दिवस, शेकडो कॉल्स अन् १५ गुन्हे!; हेल्पलाईनवर तक्रारींचा महापूर

संपूर्ण महाराष्ट्र हादरवून सोडणाऱ्या नाशिकचा भोंदू अशोक खरात प्रकरणात दररोज धक्कादायक खुलासे होत आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक नेमले असले, तरी घटनेचे गांभीर्य पाहून महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी स्वतः या तपासाचा दैनंदिन आढावा घेत असल्याची माहिती समोर येत आहे.

सुरुवातीला काही व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे अनेक महिला बदनामीच्या भीतीपोटी तक्रार करण्यासाठी पुढे येत नव्हत्या. मात्र, पोलिसांनी महिलांना विश्वासात घेऊन त्यांची ओळख गोपनीय ठेवण्याचे आश्वासन दिल्याने आता तक्रारींचा ओघ वाढला आहे. यासाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष हेल्पलाईनवर दिवसाला 5 ते 6 कॉल येत असून, गेल्या 23 दिवसांत शेकडो फोन आल्याची माहिती समोर आली आहे. तक्रार करणाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण अधिक असून, फसवणूक आणि विश्वासघातासोबतच खरातकडून दबाव तंत्राचा वापर केल्याचेही समोर आले आहे.

अशोक खरातवर आतापर्यंत विविध कलमांखाली 15 गुन्हे दाखल झाले असून, त्यापैकी 8 गुन्हे महिलांवरील अत्याचाराशी संबंधित आहेत. हेल्पलाईनवर आलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आतापर्यंत 40 जणांचे जबाब साक्षीदार म्हणून नोंदवले आहेत. यामुळे खरातभोवतीचा कायद्याचा फास अधिकच आवळला जाण्याची शक्यता आहे.