
मुंबईच्या दादर परिसरात दोन दिवसांपूर्वीच एका अनियंत्रित भरधाव बसने अनेक वाहनांना धडक दिली होती, ज्यामध्ये एका डिलिव्हरी बॉयला आपला जीव गमावावा लागला होता. ही घटना ताजी असतानाच आता मुंबईमध्ये बेस्ट बसचा आणखी एक थरारक आणि भीषण अपघात समोर आला आहे. कांदिवली येथे एका भरधाव बेस्ट बसने रस्त्यावरून जाणाऱ्या दोन पादचाऱ्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली आहे. हा संपूर्ण अपघात परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, या धडकेत दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील एका २४ वर्षीय तरुणीची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.

पोईसर डेपोजवळ भरधाव बसची धडक

मिळालेल्या माहितीनुसार, हा भीषण अपघात ८ जून २०२६ रोजी सकाळी सुमारे ११ वाजून ४० मिनिटांनी कांदिवलीच्या पोईसर डेपोजवळ घडला. गोराई डेपोची एक बस भरधाव वेगाने जात असताना, चालकाचे नियंत्रण सुटले आणि बसने रस्त्यावरून पायी जाणाऱ्या दोन पादचाऱ्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. अपघाताच्या वेळी या बसवर ‘ईव्ही ट्रान्स’ (EV Trans) कंपनीचे कंत्राटी चालक आणि बेस्टचे वाहक कर्तव्यावर होते.
२४ वर्षीय तरुणी ‘आयसीयू’त मृत्यूशी झुंजतेय
या भीषण अपघातामध्ये सोनम मौर्य (वय २४) आणि आदर्श हिरालाल यादव (वय २४) हे दोन तरुण पादचारी जखमी झाले आहेत. अपघाताचे गांभीर्य पाहून बसच्या वाहकाने (Conductor) स्थानिकांच्या मदतीने तातडीने दोन्ही जखमींना उपचारासाठी जवळच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले.या अपघातात सोनम मौर्य हिच्या डोक्याला आणि पायाला अत्यंत गंभीर दुखापत झाली आहे. ती अद्याप बेशुद्ध अवस्थेत असून तिच्यावर सध्या शताब्दी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत. तर दुसरा जखमी तरुण आदर्श यादव याच्या खांद्याला आणि उजव्या डोळ्याजवळ किरकोळ दुखापत झाली असून, त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्याच्यावर रुग्णालयात प्राथमिक उपचार केले जात आहेत.
चालकाचा निष्काळजीपणा की तांत्रिक बिघाड? पोलिसांकडून तपास सुरू
मुंबईत गेल्या काही दिवसांत बेस्ट बसच्या अपघातांचे प्रमाण कमालीचे वाढल्याचे दिसत असून, यामुळे मुंबईकरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कांदिवलीतील या ताज्या अपघाताचे अंगावर काटा आणणारे सीसीटीव्ही फुटेज आता सोशल मीडियावर समोर आले आहे.हा अपघात चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाला की बसमध्ये काही तांत्रिक बिघाड (Break Failure) झाला होता, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास केला जात आहे.










