मुंब्र्यातील जास्मिन चाळ परिसरात खळबळ; कुत्र्याच्या तोंडात सापडला नवजात बालकाचा मृतदेह!

ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरातून एक अत्यंत काळजाचा थरकाप उडवणारी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील मुंब्रा बायपास जवळील जास्मिन चाळ परिसरात एका नवजात बालकाचा मृतदेह सापडल्याने संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, भटके कुत्रे या नवजात बालकाचा मृतदेह तोंडात धरून फिरत असताना स्थानिकांच्या नजरेस पडले.

कुत्र्याने नवजात बाळाचा पाय खाल्ला…

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी ७:३० च्या सुमारास जास्मिन चाळ परिसरात काही लहान मुलं गल्लीत खेळत होती. दरम्यान, एक भटका कुत्रा एका नवजात बालकाचा मृतदेह तोंडात दाबून धावत असल्याचे या मुलांच्या निदर्शनास आले. मुलांनी विलंब न करता तत्काळ याविषयीची माहिती परिसरातील नागरिकांना दिली.

स्थानिक रहिवासी मुस्कान यांनी घडलेल्या प्रसंगाबाबत सांगितले की

“मुलांनी माहिती देताच मी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. तिथे कुत्र्याने लहान बाळाचा एक पाय खाल्ला होता. आम्ही काही लोकांनी कसाबसा तो मृतदेह कुत्र्याच्या तावडीतून सोडवला. त्यानंतर मी तत्काळ एका कपड्यात तो मृतदेह गुंडाळून ठेवला आणि मुंब्रा पोलिसांना याची कल्पना दिली.”

मुंब्रा पोलिसांकडून कसून तपास सुरू

सापडलेले नवजात बालक अंदाजे ७ ते ८ महिन्यांचे असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच मुंब्रा पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवला आहे.

घातपात की आणखी काही? स्थानिकांमध्ये संशय

कोणीतरी हे नवजात बाळ जन्माला आल्यानंतर किंवा मृत झाल्यानंतर गुपचूप येथे आणून फेकले असावे, असा संशय स्थानिकांकडून व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे, परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर मोठा असल्याने, कुत्र्यानेच हा मृतदेह इतर कुठूनतरी कचऱ्यातून किंवा झाडीतून शोधून आणला असावा, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.हा मृतदेह नेमका कुठून आला? तो कोणी फेकला होता का? की कुत्र्याने तो दुसरीकडून आणला? या सर्व बाजूंचा कसून तपास मुंब्रा पोलिसांच्या माध्यमातून केला जात आहे. या घटनेमुळे मुंब्र्यात मात्र हळहळ व्यक्त होत असून महिला वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.