
‘कानून के हात लंबे होते है’ असा डायलॉग तुम्ही हिंदी सिनेमांमध्ये अनेकदा ऐकला असेल, पण तो केवळ सिनेमापुरता मर्यादित नाही. पोलीस एखाद्या गुंतागुंतीच्या गुन्ह्याचा कशा प्रकारे छडा लावू शकतात, याचं एक उत्तम आणि जिवंत उदाहरण पनवेल पोलिसांनी सत्यात उतरवून दाखवलं आहे. एप्रिल महिन्यात चिंचोली परिसरात एका महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता, ज्याचा चेहराही ओळखता येत नव्हता. मात्र, केवळ अंगावरील दागिन्यांचा माग काढत पनवेल पोलिसांनी या अंधाऱ्या प्रकरणाचा छडा लावला असून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

चेहरा पूर्णपणे विद्रुप, पोलिसांसमोर मोठं आव्हान

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पनवेल जवळील चिंचोली गावामध्ये ११ एप्रिल २०२६ रोजी एका अज्ञात महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह इतका जळालेला होता की चेहऱ्याची ओळख पटवणं अशक्य होतं. मृतदेहाची ओळख पटवून गुन्हेगारापर्यंत पोहोचण्याचं एक मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं.
दागिन्यांचे फोटो देशभरात पाठवले, २ महिने अथक तपास
गेल्या दोन महिन्यांपासून पनवेल पोलिसांनी या प्रकरणात दिवस-रात्र एक केली होती. तपासादरम्यान विविध तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि देशभरातील बेपत्ता व्यक्तींच्या नोंदींची पडताळणी करण्यात आली.
या तपासातील सर्वात महत्त्वाचा दुवा ठरले ते मृत महिलेच्या अंगावरील दागिने! पोलिसांनी त्या दागिन्यांचे फोटो काढले आणि ते देशभरातील सर्व पोलीस स्टेशन तसेच सीआयडी (CID) कडे तपासणीसाठी पाठवले. हे दागिने कोणत्या भागातील महिला परिधान करू शकतात, याचा अंदाज बांधत पोलिसांनी तपास सुरू ठेवला. अखेर त्या दागिन्यांवरून आणि कपड्यांवरून मृत महिलेची ओळख पटली. ‘अनितादेवी भगवान राजभर’ (वय ३०) असं या मृत महिलेचं नाव असल्याचं समोर आलं.
लग्नाचा तगादा लावला म्हणून लोखंडी रॉडने केली हत्या
महिलेची ओळख पटताच पोलिसांनी तपासाची चक्रं वेगाने फिरवली. मयत अनितादेवी आणि आरोपी करण नामदेव पाटील (वय २७) हे एकमेकांच्या प्रेमात होते. अनितादेवी यांनी आरोपी करणकडे लग्नासाठी तगादा लावला होता. याच कारणावरून दोघांमध्ये प्रचंड वाद झाला. या वादातूनच रागाच्या भरात आरोपी करण याने लोखंडी रॉड अनितादेवी यांच्या डोक्यात मारून त्यांची निर्घृण हत्या केली.त्यानंतर हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने मृतदेह चिंचोली गावातील एका निर्जनस्थळी आणला आणि त्यावर डिझेल ओतून तो पेटवून दिला.
पोलीस उपआयुक्त रश्मी नांदेकर यांची माहिती
तब्बल दोन महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर या अंधाऱ्या गुन्ह्याचा उलघडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. याविषयी माहिती देताना पोलीस उपआयुक्त रश्मी नांदेकर यांनी सांगितले की,तांत्रिक आणि सखोल तपासाच्या आधारे आरोपी करण पाटील याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली असून, या प्रकरणाचा पुढील अधिक तपास पोलीस करत आहेत. चित्रपटालाही मागे पाडेल अशा या पनवेल पोलिसांच्या चाणाक्ष तपासाचे सर्वत्र कौतुक होत आहे.










