तुझ्या मुलाला नागदेवता दंश करेल..; भोंदू खरातने महिलेला दिली ‘नागदंशा’ची भीती

भोंदू अशोक खरातला पाचव्या गुन्ह्यात रविवारी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. खरातला व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. लैंगिक शोषण आणि फसवणूकप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी खरातच्या खांद्याची सर्जरी झाली असून, त्याचं डोकंही दुखत आहे.

पेनकिलर गोळ्या, औषधांनी त्याला फारसा फरक पडत नसल्याने आता वैद्यकीय तपासणीसाठी मेंदूविकार तज्ज्ञांकडे घेऊन जावे लागल्यास नवीन अर्ज करण्याची गरज भासू नये, अशी विनंती खरात याच्या वकिलांनी केली. त्यावर न्यायाधीशांनी खरातवर आवश्यक ते औषधोपचार करण्यासाठी सूचना पोलिसांना केली.

दरम्यान, एसआयटीने या पाचव्या गुन्ह्यात खरातला चार दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. न्यायालयाने ही विनंती मान्य केली. महिलेवर अत्याचार व जादूटोणाची भीती दाखविणे हा पाचवा गुन्हा खरातवर सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल आहे. पाचवा गुन्हादेखील गंभीर स्वरूपाचा असल्याचे सरकारी अभियोक्ता किरण बेंडभर, अॅड. शैलेंद्र बागडे यांनी सांगितले. न्या. पटेल यांच्याकडे सुनावणी झाली.

भोंदू अशोक खरातबाबत रविवारच्या सुनावणीत तपास अधिकाऱ्यांनी केलेला धक्कादायक खुलासा महत्त्वपूर्ण ठरला. खरातने पीडित महिलेला पेढा खाऊ घातला होता. नंतर गुंगी निर्माण करणारे पाणी देऊन तिच्यावर अत्याचार केले. मी सांगेन तसेच कर, माझ्यात दैवी चमत्कार असून त्याने तुलाच फायदा होईल, असे सांगून अत्याचाराबाबत कुणास काही सांगितलं तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल, असे सांगून पीडितेच्या मनात भीती घातली असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.