‘मटण शिजलं नाही’ म्हणत पत्नीचा पाहुण्यांसमोर अपमान; किरकोळ वादाने उद्ध्वस्त झाला संसार

यवतमाळ येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केवळ मटण नीट शिजले नाही म्हणून पत्नीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. घरी जेवायला आलेल्या मित्रासमोर पतीने केलेला अपमान सहन न झाल्याने विष प्राशन करून पत्नीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेने पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहे.

घडलेली घटना आर्णी तालुक्यातील बोरगाव येथे घडली. आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव चेतना मनोज जाधव असे आहे. चेतनाचा पती मनोज जाधव याने एका मित्राला जेवणासाठी घरी बोलावले होते. ‘मटणाची भाजी बेतशीर आणि चांगली कर,’ अशी सूचना त्याने पत्नीला दिली होती.

अंगणात जेवणाचा बेत रंगला होता पण पाहुण्यासमोरच मनोजचा पारा चढला. मटण व्यवस्थित शिजले नसल्याच्या कारणावरून त्याने पत्नीशी जोरदार वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद केवळ स्वयंपाकापुरता मर्यादित राहिला नाही, तर त्यात मनोजच्या जुन्या संशयी स्वभावाचा आणि व्यसनाचा तडका लागला. मनोजने चेतनाला बेदम मारहाण केली. यामुळे चेतना अत्यंत दुखावली गेली.

याच दुःखातून आणि नैराश्यातून चेतनाने टोकाचा पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. भरल्या ताटावरून उठून ती आत गेली आणि तिने विषारी औषध प्राशन केले. बाहेर येऊन तिने पतीला ही बाब सांगितली तेव्हा एकच खळबळ उडाली. चेतनाला तातडीने आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.