खळबळजनक! भोंदू अशोक खरातच्या साम्राज्याला सुरुंग; कोट्यवधींच्या मालमत्तेवर येणार टाच!

भोंदू अशोक खरात याच्या कथित आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कारवाईचा वेग वाढवला असून, त्याच्या बेनामी संपत्तीवर टाच आणण्यासाठी महत्त्वाची पावले उचलली जात आहेत.प्राथमिक तपासात बेकायदेशीर मार्गाने मिळवलेली मालमत्ता तात्पुरती जप्त (प्रोव्हिजनल अटॅचमेंट) करण्याची प्रक्रिया ‘ईडी’कडून राबवली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पुढील टप्प्यात खरात यास समन्स बजावून चौकशी, बैंक खात्यांची तपासणी,आर्थिक देवाणघेवाणीचे विश्लेषण आणि आवश्यकता असल्यास अटकेची कारवाईही केली जाऊ शकते. त्यामुळे एसआयटीकडून ईडीकडे खरातचा ताबा काही दिवसांपुरता जाऊ शकतो. त्यासाठी ईडी न्यायालयाची परवानगी मागणार आहे. सध्या खरात पाचव्या गुन्ह्यात पोलिस कोठडीत आहे. खरातची किमान १५ ते १७ हजार कोटींची संपत्ती असल्याचा अंदाज आहे. यात कोट्यवधीची बेनामी मालमत्ता आहे.ईडीकडून एक स्वतंत्र गुन्हा खरातवर अगोदरच दाखल झालेला आहे. त्यानंतर त्याच्या घरासह कार्यालयावर ईडीने धाड टाकली होती. या चौकशीत खरातचे प्रॉपर्टी रॅकेट समोर आले होते. त्यात आता खरातशी संबंधित शासनातील काही अधिकारी, खासगी ब्रोकर, पुणे व नाशिकमधील काही विकासक रडारवर आहेत. नाशिक-अहिल्यानगर-पुणे यादरम्यानचे खरातचे प्रॉपर्टी रॅकेट उघड झाल्यानंतर सोलापूरमध्ये देखील खरातने जमीन लाटल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर ईडीकडून अत्यंत सावध पावले उचलली जात असून पहिल्या टप्प्यात खरातचे बँक खाते तात्पुरते सील करण्यात आले.

खरातच्या अनेक प्रॉपर्टीची कच्ची नोंद आढळून आली होती. नाशिकमधील खरातच्या निवासस्थानी ईडीच्या पथकाने सुमारे १४ तास सखोल झडती घेतली होती. या कारवाईदरम्यान विविध मालमत्तांशी संबंधित कागदपत्रे, आर्थिक व्यवहारांच्या नोंदी आणि इतर महत्त्वाची माहिती जप्त करण्यात आली. तसेच खरातच्या कार्यालयावरही छापा टाकून व्हिजिटर बुकसह काही संवेदनशील कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहेत.सध्या जप्त केलेल्या कागदपत्रांची तपशीलवार छाननी सुरू असून आर्थिक व्यवहारांची साखळी (मनी ट्रेल) शोधण्याचे काम ईडीकडून करण्यात येत आहे. संशयित व्यवहारांमधून मिळालेल्या संपत्तीचे मोजमाप करून त्याचा सविस्तर अहवाल शासनाला सादर केला जाणार आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर ईडीकडून न्यायालयात खटला दाखल केला जाईल. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेनुसार संबंधित संपत्ती कायमस्वरूपी जप्त करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. खरातकडून मनी लॉड्रिंगचा संशय वाढल्याने ईडी ‘पीएमएलए ‘अंतर्गत स्वतंत्र चौकशी सुरू करण्यात आली आहे.