लग्नासाठी ‘पोलीस’ बनला भाजी विक्रेता!

‘सिंघम’ किंवा ‘सिम्बा’ सारख्या चित्रपटांचा पडद्यावरचा रुबाब आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण हाच रुबाब लग्नासाठी चांगलं स्थळ मिळावं म्हणून प्रत्यक्षात आणणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलंय. न होणारा ‘पोलीस’ झाला, पेढे वाटले, फ्लेक्स लावले… पण नशिबाचा फेरा असा की, ज्या पोलिसांना फसवण्याचा प्रयत्न केला, त्यांनीच त्याला दारात येऊन बेड्या ठोकल्या!

सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे येथे राहणारा २६ वर्षांचा ऋषिकेश राजू जाधव. व्यवसायाने भाजी विक्रेता, पण मनात पोलीस होण्याचं स्वप्न! मात्र, नशिबाने साथ दिली नाही. पोलीस भरतीसाठी उंची कमी पडली आणि स्वप्नांचा चक्काचूर झाला. पण हे स्वप्न भंगलेलं असतानाच, घरून लग्नासाठी तगादा सुरू झाला. ‘मुलगा पोलीस असेल तर चांगलं स्थळ येईल’, हीच गोष्ट ऋषिकेशच्या मनावर स्वार झाली आणि त्याने एक भयंकर ‘प्लॅन’ आखला.

ऋषिकेशने घरी सांगितलं की, त्याची निवड थेट ‘पुणे पोलीस’ दलात झाली आहे! केवळ खोटं बोलून तो थांबला नाही, तर त्याने अख्ख्या सोसायटीत पेढे वाटले. चौकाचौकात ‘पुणे पोलीस पदी निवड’ झाल्याचे भव्य फ्लेक्स लावले. व्हॉट्सॲपवर पोलीस वर्दीतला फोटो स्टेटस म्हणून ठेवला. नऱ्हे परिसरात ऋषिकेशच्या ‘यशाची’ चर्चा वाऱ्यासारखी पसरली.

आपल्या हद्दीतला एक सामान्य मुलगा पोलीस दलात भरती झाला, हे पाहून नऱ्हे पोलीस स्टेशनचे अधिकारीही भारावून गेले. कौतुकाची थाप देण्यासाठी आणि ऋषिकेशचं अभिनंदन करण्यासाठी पोलीस थेट त्याच्या घरी पोहोचले. पण इथेच खरा ‘ट्विस्ट’ आला! पोलीस अधिकाऱ्यांनी जेव्हा ऋषिकेशकडे त्याचं नियुक्ती पत्र मागितलं, तेव्हा त्याची बोबडी वळली. त्याने दाखवलेली कागदपत्रे बनावट असल्याचं समोर येताच पोलिसांचाही पारा चढला.

“ऋषिकेशचं स्वप्न पोलीस होण्याचं होतं हे मान्य, पण त्यासाठी त्याने निवडलेला मार्ग पूर्णपणे चुकीचा होता. महाराष्ट्र पोलिसांच्या चिन्हाचा गैरवापर आणि लोकांची दिशाभूल केल्याप्रकरणी ऋषिकेशवर आता BNS कलम २०४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नासाठी मांडलेला हा ‘खेळ’ आता त्याला थेट जेलची हवा खायला लावणार आहे.