
सायबर फसवणूक करणाऱ्या ठगाच्या टोळीमधील वादामुळेच एका मोठा डिजिटल घोटाळ्याचा पर्दाफाश झाला आहे. ही घटना पुण्यातील कॅम्प परिसरात घडली आहे. कॅम्प परिसरात राहणाऱ्या ८५ वर्षांच्या एका वृद्ध महिलेला तब्बल एक कोटीला गंडवलं होतं.

अमली पदार्थ आणि मनी लाँड्रिंगची भीती दाखवती तिच्याकडून पैसे उकळण्यात आले होते. मात्र या ठगांमधील वादाचा परिणाम असा झाली की त्यांचं पितळ उघड पडलं.

मिळालेल्या माहितीनुसार, ठगांच्या टोळीने पुण्यातील एक ज्येष्ठ महिलेला डिजिटल अरनेस्टच्या नावाखाली एक कोटींना गंडवलं होतं. पीडित महिला कॅम्प भागातील ईस्ट स्ट्रीटवरील एक उच्चभ्रू सोसायटीत राहत होती. ती २७ मार्च ते ७ एप्रिलपर्यंत डिजिटल अरेस्टमध्ये होती. एनआयए आणि सीबीआयचे अधिकारी होऊन ठगांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून वृद्ध महिलेची फसवणूक केली होती. मात्र एक कोटींवरुन या ठगांच्या टोळीत वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, त्यातील एका आरोपीने रागाच्या भरात पुणे पोलिसांना फोन केला.
त्याने पोलिसांना घडलेला प्रकार सांगितलं. धक्कादायक बाब म्हणजे या ठगाने महिलेचा नातू असल्याचं पोलिसांना सांगितलं आणि तो दुबईत राहत असल्याचंही म्हणाला. सुरुवातीला पोलिसांना हा कॉल खोटा असल्याचं वाटलं. कारण फोन करणारी व्यक्ती पीडित महिलेच्या सुरक्षेपेक्षा पैशांबद्दल अधिक बोलत होती. त्यामुळे घटनेचं गांभीर्य लक्षात घेत सायबर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. फोन करणाऱ्या व्यक्तीचे लोकेशन शोधून पोलिसांनी पुण्यातील एका नामांकित हॉटेलवर छापा टाकला. या कारवाईत ठगांच्या टोळीला ताब्यात घेण्यात आलं.










