
धाराशिव जिल्ह्यातील खामसवाडी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. केवळ जमिनीच्या वादातून एका सख्ख्या चुलत्याने आपल्या 21 वर्षांच्या पुतण्याचा काटा काढला आहे.विलास शेळके असे आरोपी चुलत्याचे नाव असून त्याने सुजित शेळके या तरुण पुतण्यावर चाकूने वार करत त्याचे आयुष्य संपवले.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विलास शेळके आणि मयत सुजित शेळके यांच्या कुटुंबात जमिनीच्या व्यवहारावरून मागील काही काळापासून वाद सुरू होता. या वादातून विलासच्या मनात पुतण्याबद्दल प्रचंड राग होता. रात्री साडेदहाच्या सुमारास हा राग अनावर झाला आणि एका भीषण घटनेत त्याचे रूपांतर झाले.

घटनेच्या रात्री सुजित हा आपल्या आजी-आजोबांसोबत झोपलेला होता. यावेळी आरोपी विलास तिथे आला आणि त्याने सुजितला उद्देशून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. शिवीगाळीचे रूपांतर वादात झाले आणि काही समजण्यापूर्वीच विलासने आपल्याकडे असलेल्या चाकूने सुजितच्या पोटावर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सुजितचा मृत्यू झाला.
भररात्री घडलेल्या या प्रकारामुळे खामसवाडी गावात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मृत सुजित शेळके याच्या आईने दिलेल्या जवाबावरून शिराढोण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सख्ख्या चुलत्यानेच जमिनीच्या हव्यासापोटी पुतण्याचा काटा काढल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. शिराढोण पोलिसांनी या प्रकरणी वेगाने तपास सुरू केला असून आरोपीला जेरबंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.










