
लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे नात्यांना काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीचे एका महिलेबरोबर अनैतिक संबंध असल्याने संतापलेल्या महिलेने अत्यंत धक्कादायक कृत्य केलं आहे.

पतीच्या विवाहबाह्य संबंधांचा सूड घेण्याच्या भावनेतून एका महिलेने थेट स्वतःच्या पुतण्याचाच गळा आवळून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी अनिता स्वामी हिला अटक केली असून, तपासात या गुन्ह्यामागील थरारक कट उघड झाला आहे.

चाकूरमध्ये दोन चिमुकली मुले अचानक बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली. सात वर्षांचा देवांश स्वामी आणि त्याचा चुलत भाऊ सकाळी घराबाहेर खेळण्यासाठी गेले होते. मात्र बराच वेळ उलटूनही ते परत न आल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. अखेर पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम हाती घेतली. परिसरात शोध सुरू असतानाच उजळबं रोडवरील एका पडक्या वाड्याजवळ ट्रॅक्टरच्या टायरच्या आडोशाला देवांशचा मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर चाकूरसह संपूर्ण परिसर हादरून गेला.
दरम्यान, तपासादरम्यान घरातीलच एक व्यक्ती संशयाच्या भोवऱ्यात आली. फिर्यादीची वहिनी अनिता स्वामीचं वर्तन पोलिसांना संशयास्पद वाटलं. घटनेनंतर मोबाईल बंद, काही काळ घराबाहेर आणि चौकशीत विसंगत माहिती याच धाग्यावर पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि कॉल डिटेल्सच्या आधारे तपास अधिक खोलवर नेला. या तपासातून एक धक्कादायक सत्य समोर आलं.
अनिता स्वामीनेच संपूर्ण कट रचल्याचं स्पष्ट झालं. पतीच्या कथित अनैतिक संबंधांवरून निर्माण झालेल्या वादातून तिने पुतण्याचं अपहरणाचा बनाव करून निर्दयीपणे खून केला. आरोप दुसऱ्या महिलेवर टाकण्याचा प्रयत्न अनिता स्वामीने केला. मात्र पोलिसांच्या सखोल तपासामुळे हा कट उघड झाला. आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकली असून तिला अटक करण्यात आल्याची माहिती लातूरचे पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी दिली.










