
नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली असून, आता या प्रकरणाचे धागेदोरे राजकीय वर्तुळाशी संबंधित व्यक्तींपर्यंत पोहोचले आहेत.

राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांना शिर्डी पोलिसांनी अधिकृत नोटीस बजावली आहे. समता पतसंस्थेतील संशयास्पद आर्थिक व्यवहाराप्रकरणी ही नोटीस धाडण्यात आली असून त्यांना चौकशीसाठी शिर्डी पोलीस ठाण्यात हजर राहावे लागणार आहे.

भोंदू अशोक खरात विरोधात शिर्डीत बेकायदेशीर सावकारी आणि आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. तपासादरम्यान पोलिसांना ‘समता पतसंस्थेत’ खरातशी संबंधित अनेक संशयास्पद खाती आढळली आहेत. प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलांच्या नावे या पतसंस्थेत एकूण 4 खाती आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या खात्यांवरून तब्बल 2 कोटी 40 लाख रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. या आर्थिक व्यवहारांचा खरातच्या सावकारी व्यवसायाशी काय संबंध आहे? हे पैसे कोणाचे आहेत? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पोलिसांनी ही नोटीस बजावली आहे.
शिर्डी पोलिसांनी प्रतिभा चाकणकर यांच्या उपलब्ध असलेल्या दोन वेगवेगळ्या पत्त्यांवर पोस्टाद्वारे ही नोटीस पाठवली आहे. नोटीस मिळाल्यापासून 5 दिवसांच्या आत त्यांना चौकशीसाठी आणि जबाब नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात हजर राहावे लागणार आहे.










