वाघोलीत ३१ लाखांचे ड्रग्स जप्त; विमाननगरनंतर पोलिसांची दुसरी मोठी कारवाई

मेफेड्रोन (एमडी) विक्री करणारे तस्करांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील वाघोली परिसरात मेफेड्रोन विक्री प्रकरणात दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ३७ ग्रॅम मेफेड्रोनसह दोन मोटारी, दुचाकी, मोबाइल संच असा ३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

योगेश सुभाष कणगरे (वय ३८, रा. शिवकृपा बिल्डींग, साईनगर, लोहगाव), सोनू सिंह उर्फ मनुवेंद्र शंकर सिंह (वय ४२, रा. विद्यानगर, विश्रांतवाडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये दोघांविरुद्ध वाघोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

वाघोली परिसरात पोलिसांचे पथक गस्त घालत होते. त्या वेळी कणगरे हा मोटारीतून सातव वस्ती परिसरात आला. त्याच्याकडे मेफेड्रोन असल्याची माहिती पोलीस कर्मचारी प्रदीप मोटे, विशाल गायकवाड यांना मिळाली. पोलिसांनी त्याच्याकडून ५ ग्रॅम ३ मिलिग्रॅम मेफेड्राेन, तसेच मोटार जप्त करण्यात आली. चौकशीत सोनू सिंह याच्याकडून मेफेड्रोन खरेदी केल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सिंह याला सापळा लावून पकडले. त्याच्याकडून दुचाकी आणि मेफेड्रोन जप्त केले.

पोलिसांनी सिंह याला ताब्यात घेतल्यानंतर चौकशी केली. तेव्हा त्याने घराजवळ लावलेल्या मोटारीत मेफेड्रोन लपवून ठेवल्याची माहिती दिली. पोलिसांच्या पथकाने सिंह याचे विद्यानगर परिसरातील घर आणि मोटारीची तपासणी केली. तेव्हा मोटारीतून चार लाख ६४ हजार रुपयांचे २३ ग्रॅम मेफेड्रोन जप्त केले. सिंह याची मोटारही पोलिसांनी जप्त केली. पोलिसांनी या कारवाईत दोन मोटारी, दुचाकी, मोबाइल संच, मेफेड्रोन असा ३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक आयुक्त नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, गुन्हे शाखेच्या निरीक्षक पल्लवी मेहेर, सहायक निरीक्षक विनायक अहिरे, उपनिरीक्षक मनोज बागल, राहुल काेळपे, बाबासाहेब मोराळे, प्रदीप मोटे, मंगेश जाधव, सुनील कुसाळकर, समीर भोरडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, दीपक कोकरे यांनी ही कारवाई केली.

दरम्यान, मेफेड्रोन विक्रीसाठी आलेल्या दोघांना विमानतळ पोलिसांनी नुकतीच अटक केली. त्यांच्याकडून मेफेड्रोन, दुचाकी, मोटार असा २६ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्रीतम प्रफुल्ल कुलकर्णी (वय ३७, रा. साईनाथनगर, वडगाव शेरी), उबेर अन्सार खान (वय २७, रा. रेल्वे फाटक, हडपसर) यांना अटक करण्यात आली होती.