महाराष्ट्राला मिळणार पहिली महिला मुख्यमंत्री?; अजितदादांचं ‘ते’ स्वप्न सुनेत्रा पवार पूर्ण करणार?

दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनामुळे बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होत आहे. यामध्ये सुनेत्रा पवार बिनविरोध निवडून येणार आहेत. जोरदार राजकारण झाल्यानंतर काँग्रेसने अर्ज मागे घेतला. त्यामुळे सुनेत्रा पवारांविरोधात कोणताही प्रबळ नेता नसल्याने त्या निवडणूक जिंकणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. अजित पवारांनंतर सुनेत्रा पवार यांनी राज्याची व पक्षाची सुत्रे हाती घेत उपमुख्यमंत्री पद स्वीकारले. मात्र त्या लवकर मुख्यमंत्री होतील अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे.

सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र त्यांना लवकरच राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री होण्याचा देखील मान मिळू शकतो अशा चर्चा रंगल्या आहेत. याचे कारण म्हणजे खासदार संजय राऊत यांनी केलेले सूचक विधान. खासदार संजय राऊत यांनी मुंबंईमध्ये माध्यमांशी संवाद साधून अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. त्यांनी महायुतीमध्ये समीकरणे बदलणार असून शिंदेंना धक्का देऊन भाजप सुनेत्रा पवारांना सोबत घेऊ शकतो अशी राजकीय भविष्यवाणी खासदार राऊतांनी केली.

खासदार संजय राऊत यांनी बारामतीच्या निवडणुकीवर भाष्य केले. ते म्हणाले की,”भले, आज तुम्हाला मोदी आणि शाहांनी उभं केलं असेल पण जर पवारांनी जर बारामती उभी केली नसती तर त्यापुढच्या कोणत्याही पवारांना महाराष्ट्रात कोणतेच स्थान मिळाले नसते,शरद पवारांच्या अस्तित्वाशिवाय बारामती आहे का, तुम्ही कितीही मोठे झालात, अजित पवार, सुप्रिया सुळे, त्यांचे चिरंजीव असतील. तुम्ही आज राजकारणात पवार म्हणून उभे आहात, ते शरद पवारांमुळे आहात. याचा विसर पडता कामा नये. शरद पवारांची पुण्याई पाठीशी आहे. तुम्ही कितीही नाही म्हटलं, कितीही टाळण्याचा प्रयत्न केला, तरी पवारांची पुण्याई आहेच,” असा टोला खासदार संजय राऊतांनी लगावला.