“पाहुण्यांकडे जाऊया…” म्हणत घेऊन गेली अन् परतला तो केवळ मृतदेह!

अनैतिक संबंधांत अडथळा ठरलेल्या मुलाची आईनेच प्रियकराच्या मदतीने हत्येचा कट रचून मुलाची निर्घृण हत्या घडवून आणल्याची धक्कादायक घटना हिंगोली जिल्ह्यात उघडकीस आली आहे. सेनगाव तालुक्यातील जामदया शिवारात ८ एप्रिल रोजी ही घटना घडली होती. स्थानिक गुन्हे शाखेने केवळ ४८ तासांत या गुन्ह्याचा छडा लावत मुलाच्या आईसह, तिचा ६५ वर्षीय प्रियकर आणि सुपारी घेणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकी घटना काय?

८ एप्रिल रोजी जामदया ते खिल्लार रस्त्यावर एका तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला होता. त्याचे डोके दगडाने ठेचलेले असल्याने ओळख पटवणे कठीण होते. पोलिसांनी मृताचा फोटो सोशल मीडियावर प्रसारित केल्यानंतर, तो तरुण बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील वढव येथील सचिन राजगुरू असल्याचे निष्पन्न झाले.

पाहुण्यांकडे जाण्याचे निमित्त अन् घात

पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सचिनची आई लीलाबाई हिचे वढव गावातीलच रामदास तनपुरे (वय ६५) याच्याशी अनैतिक संबंध होते.या संबंधात सचिन अडथळा ठरत असल्याने मुलाचा हा अडसर कायमचा दूर करण्यासाठी लीलाबाईने प्रियकर रामदाससोबत मिळून हत्येचा कट रचला. यासाठी त्यांनी नरेश साबण्या पवार याला २५ हजार रुपयांची सुपारी दिली.

हत्येच्या दिवशी, आरोपींनी सचिनला “पाहुण्यांकडे जायचे आहे” असे सांगून सोबत नेले. साखरा परिसरात नेऊन त्याला आधी मद्य पाजण्यात आले. त्यानंतर जामदया शिवारात नेऊन त्याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या करण्यात आली आणि आरोपींनी तिथून पळ काढला.

पोलिसांचा तपास आणि अटक

अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर हिंगोलीच्या पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तयार करण्यात आली होती. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित रामदास तनपुरेला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि यामागची सूत्रधार खुद्द सचिनची आईच असल्याचे उघड झाले.

या प्रकरणी पोलिसांनी लीलाबाई राजगुरू, रामदास तनपुरे आणि नरेश पवार या तिघांना अटक केली आहे. या घटनेने संपूर्ण हिंगोली आणि बुलढाणा जिल्ह्यात खळबळ उडाली असून, नात्यातील या क्रूरतेमुळे संताप व्यक्त केला जात आहे.