
रेल्वे स्थानकांवरील गर्दीचा फायदा घेऊन चोऱ्या करणाऱ्या एका संघटित आणि अजब टोळीचा रेल्वे सुरक्षा दलाने पर्दाफाश केला आहे. या टोळीचे वैशिष्ट्य म्हणजे, याचा सूत्रधार बेरोजगार तरुणांना कामाचे आमिष दाखवून चक्क मासिक पगारावर चोऱ्या करण्यासाठी कामावर ठेवत असे. आरपीएफचे सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

या टोळीचा सूत्रधार वर्षभर अशा तरुणांच्या शोधात असतो जे बेरोजगार आहेत किंवा मोठ्या आर्थिक अडचणीत आहेत. तरुणांना 15 ते 25 हजार रुपये मासिक पगाराचे आमिष दाखवून सुरुवातीला “सोपे काम” असल्याचे सांगितले जाते. एकदा का तरुण जाळ्यात अडकला की, त्याला रेल्वे स्थानकांवर चोरी करण्याचे विशेष प्रशिक्षण दिले जाते. सुरुवातीला छोट्या चोऱ्यांचे ‘टार्गेट’ दिले जाते आणि कामगिरी चांगली असल्यास पगारात वाढही केली जाते.

आरपीएफने या कारवाईत कैलाश दास (42, बिहार) टोळीचा मुख्य सूत्रधार, मिथिलेश शाह (29, बिहार), किशन निषाद (22, छत्तीसगड) या तिघांना अटक केली आहे. हे आरोपी रेल्वे स्थानकावर किंवा डब्यात बसून वृत्तपत्र (पेपर) वाचण्याचा बहाणा करायचे. प्रवाशाने आपल्या सामानावरून लक्ष हटवले की, क्षणात वस्तू लंपास करून पसार व्हायचे.
या टोळीने नागपूरसह मध्य आणि दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेच्या अनेक स्थानकांवर धुमाकूळ घातला होता. नागपूर आणि इतवारी तर भिलाई, रायगड, बिलासपूर (छत्तीसगड) या स्थानकांवर हे चोर सक्रीय होते. गर्दीचा आणि प्रवाशांच्या छोट्याशा निष्काळजीपणाचा फायदा घेऊन हे आरोपी क्षणार्धात मौल्यवान वस्तू पळवत असत.










