
मुंबईच्या दादर परिसरातील कामगार नगरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं सात ते आठ जणांनी एका व्यवसायिकाची निर्घृण हत्या केली आहे. नराधम आरोपींनी पत्नीसमोरच पतीला बेदम मारहाण केली.

या मारहाणीत व्यावसायिकाचा मृत्यू झाला. ही घटना घडताच दादर पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतलं आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

अंकुश आंबोकर असं हत्या झालेल्या ४० वर्षीय व्यावसायिकाचं नाव आहे. दादरच्या कामगार नगरमध्ये सात ते आठ जणांच्या जमावाने त्यांच्यावर हल्ला केला. ज्यावेळी हल्ला झाला, त्यावेळी अंकुश यांची पत्नी सिद्धीविनायक मंदिरात होती. त्या मंदिरात सिक्युरीटी गार्ड म्हणून काम करतात. पतीवर हल्ला झाल्याची माहिती कळताच त्या मंदिरातून धावत बाहेर आल्या. त्या पळत पळत कामगारमध्ये आल्या. इथं सात ते आठजण अंकुश यांना मारहाण करत होते. त्यांनी पतीला होणारी मारहाण रोखण्याचा प्रयत्न केला. पण आरोपी मारतच राहिले. अंकुश आंबोकर बेशुद्ध झाल्यानंतर आरोपी पळून गेले.
या मारहाणीनंतर अंकुश आंबोकर (४०) यांना तातडीने केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकुश आणि त्याच्या हत्येतील प्रमुख आरोपी गौरव सणस हे पूर्वी एकत्र बेंजोचा व्यवसाय करत. २०१७मध्ये ते वेगळे झाले आणि स्वतंत्र व्यवसाय करू लागले. त्यानंतर गौरव हा अंकुशला सतत धमकावत असे, मारहाणही करत असे. प्रत्येक वेळी दादर पोलीस ठाण्यात गौरव विरोधात तक्रारी केल्या आहेत.
घटनेच्या वेळी रविवारी अंकुश आपल्या मित्राला भेटण्यासाठी वरळी येथील सेंच्युरी बाजार परिसरात जाण्यासाठी निघाले होते. तेव्हा गौरव आणि त्याच्या साथीदारांनी अंकुशला अडवून मारहाण सुरू केली. सिद्धिविनायक मंदिरात सुरक्षारक्षक असलेल्या पत्नीला याबाबत कळताच ती घटनास्थळी पोहोचली. तिने लोकांच्या मदतीने अंकुशला सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीने सर्वांना धमकावले. अंकुशला बेशुद्ध होईपर्यंत मारल्यानंतर हे टोळके पसार झाले. अंकुशला केईएम रुग्णालयात नेण्यात आले. मात्र दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. चार ते पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.










