
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली होती. एका 22 वर्षाच्या तरुणीचा सासरी छळ होत असताना 12 एप्रिल रोजी गळा दाबून मारण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

लग्नाला चार महिने झाले नव्हते. सोनाली शिंदे असं तरुणीचं नाव होतं. अशातच आता सोनालीच्या सासरच्यांना पोलिसांनी मोठा इंगा दाखवला आहे. हुंड्यासाठी एका नवविवाहितेचा छळ करून तिचा खून करणाऱ्या पती आणि सासूला न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सारोळे गावातील या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून आरोपींना फाशी द्यावी, अशी मागणी केली जातीये.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रतीक अनंत शिंदे आणि त्याची आई भामाबाई अनंत शिंदे अशी कोठडी मिळालेल्या आरोपींची नावे आहेत. लग्नात अपेक्षित हुंडा दिला नाही आणि मानपान केला नाही, या कारणावरून लग्नानंतर काही दिवसांतच विवाहितेचा छळ सुरू झाला होता. सासरच्या मंडळींकडून तिला सातत्याने मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. मोहळ पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले असता, या गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी न्यायालयाने त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
सोनालीचे वडील दत्तात्रय सुरवसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोहोळ पोलीस ठाण्यात पती प्रतीक शिंदे आणि सासू भामाबाई उर्फ वंदना आनंद शिंदे यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवघ्या 4 महिन्यांपूर्वी मोठ्या आशेने सोनालीचा विवाह प्रतीकशी लावून देण्यात आला होता, मात्र तिच्या नशिबी असा करुण अंत येईल, याची कोणी कल्पनाही केली नव्हती. लग्नानंतर काही दिवसांतच सासरच्या मंडळींनी आपला खरा चेहरा दाखवण्यास सुरुवात केली होती.
“लग्नात टीव्ही दिला नाही, आमचा मानपान करून सोन्याची अंगठी पण आमच्या मुलाला घातली नाही,” असे टोमणे मारत सोनालीचा छळ सुरू झाला होता. नालीच्या गरीब आई-वडिलांनी परिस्थिती नसतानाही 20 हजार रुपये देऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. तरी देखील सोनालीचा छळ सुरूच होता. पैसे आणि दागदागिन्यांच्या हव्यासापोटी पती आणि सासूकडून विवाहितेला वारंवार मारहाण केली जात होती. हा छळ इतका पराकोटीला गेला की, अखेर पैशांच्या कारणावरून या नवविवाहितेचा निर्घृण खून करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ चक्रे फिरवून आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत










