
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातबाबत दिवसेंदिवस नवनवीन खुलासे होत आहेत. त्याच्याविरोधात एकूण १५ गुन्हे दाखल आहे. सोमवारी अशोक खरातला न्यायालयात हजर केलं असता त्याला सात दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

याच वेळी एसआयटीनं चौथ्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी अशोक खरातचा ताबा मागितला. त्यामुळे आज त्याला पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणार आहे. त्यानंतर त्याची रवानगी पोलीस कोठडीत होऊ शकते.

एकीकडे अशोक खरातच्या अडचणी वाढत असताना आता खरातच्या सासूबाई पार्वती शिंदे यांनी खळबळजनक प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या जावयाची सुटका नाही झाली तरी चालेल मात्र आपली मुलगी परत यावी, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
खरं तर, अशोक खरातला अटक झाल्यापासून त्याची पत्नी कल्पना खरात फरार आहे. ती नेमकी कुठे गेली? याबाबत कुणाला काहीच थांगपत्ता नाहीये. नाशिक पोलिसांची अनेक पथकं कल्पना खरातच्या मागावर आहेत. मात्र त्यांना कल्पना खरातबाबत काहीच माहिती मिळत नाही. याबाबत अशोक खरातकडे विचारणा केली असता ‘बायको कुठे आहे, हे देवालाच माहीत’ अशा आशयाची गोंधळून टाकणारी प्रतिक्रिया दिली आहे. आता या सगळ्यावर कल्पना खरातची आई आणि अशोक खरातच्या सासुबाई पार्वती यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
मागच्या जवळपास २५ दिवसांपासून कल्पना खरात गायब असण्याबद्दल त्यांच्या आईला विचारलं असता, त्यांनी सांगितलं की, मला कुणीच काही सांगत नाही. मी कुणाला काही विचारतही नाही. त्यांना तिकडे नेऊन का कोंडलंय? हे मला माहीत नाही, आमच्या खांदाणात असं नाही झालं. याचं वाईट वाटत आहे. एवढं काय झालंय, की त्यांना तुरुंगात टाकलंय?
“आमची मुलगी तर खूप शांत आहे. कधी कुणाला काही म्हणाली नाही. बोलली नाही. आता तिच्या कर्माला हे काय आलंय? ती आता कधी सुटेल आणि कधी नाही, हे माहीत नाही, मला वाटतंय तिने लवकर यावं. आमची पोर कधी इतके दिवस दूर राहिली नाही. आता आठ-पंधरा दिवस झाले गायब आहे. आमची मुलगी फक्त घरी आली पाहिजे, जावई नाही आले तरी चालतील,” असंही अशोक खरातच्या सासुबाईंनी सांगितलं.










