भावाने बहिणीला तडफडून मारलं; कोल्हापूरजवळचा तो ‘अमानुष’ प्रकार ऐकून अंगावर येईल काटा!

महाराष्ट्राच्या सीमेवर असणाऱ्या गावात ऑनर किलिंगची एक धक्कादायक घटना घडली आहे. बहिणीने अन्य जातीच्या तरुणासोबत प्रेमविवाह केल्याच्या रागातून भावाने विष पाजून तरुणीची हत्या केली आहे.

आरोपीनं आपल्या काकांच्या मदतीने बहिणीचा काटा काढला आहे. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने तरुणीचा मृतदेह सांगलीत आणून जाळला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.

या घटनेत हत्या करण्यात आलेल्या महिलेचं नाव सत्यव्वा संतोष हेळवी असं आहे. सत्यव्वा यांचं आधीच लग्न झालं होतं, मात्र लग्नानंतरही त्यांचं एका दुसऱ्या जातीतील तरुणासोबत प्रेमसंबंध होते. काही दिवसांपूर्वी त्या आपल्या प्रियकरासोबत पळून गेल्या होत्या. आपली बहीण दुसऱ्या जातीतील तरुणासोबत गेल्याचा राग तिच्या भावाच्या मनात होता. यातूनच कुटुंबाची बदनामी झाल्याचा संताप व्यक्त करत त्याने बहिणीचा काटा काढण्याचे ठरवले.

सत्यव्वा घरी परतल्यानंतर, तिच्या भावाने काका आणि भाऊजी यांच्या मदतीने तिला विष पाजले. अत्यंत क्रूरपणे तिला संपवल्यानंतर, ही घटना कोणालाही कळू नये म्हणून आरोपींनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचं नियोजन केलं. पोलिसांना सुगावा लागू नये म्हणून त्यांनी बेळगाव सोडून महाराष्ट्र गाठले.

गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी सत्यव्वा यांचा मृतदेह सांगली जिल्ह्यातील आरग येथे नेला. तिथे कोणालाही शंका येऊ न देता मृतदेहावर परस्पर अंत्यसंस्कार करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या धक्कादायक प्रकाराची माहिती समोर येताच परिसरात खळबळ उडाली आहे.

सत्यव्वा यांचे लग्नानंतरही इतर जातीच्या तरुणाशी असलेले प्रेमसंबंध नातेवाईकांना मान्य नव्हते. याच ‘इज्जती’च्या खोट्या अहंकारातून एका भावाने बहिणीचे रक्ताचे नाते विसरून तिची हत्या केली. याप्रकरणी आता पोलीस कसून तपास करत असून आरोपींना अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे.