
एका नामांकित संस्थेच्या महिला प्राचार्याला ब्लॅकमेल करून सात लाख रुपये उकळल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकासह तीन पोलिस कर्मचाऱ्यांविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत ही मोठी कारवाई केली आहे.

अजित बडे, सोनाली हिंगे, सुदाम तायडे अशी संशयित आरोपींची नावे आहेत. पोलिस उपनिरीक्षक अजित बडे हे सध्या सायबर पोलिस स्टेशन येथे कार्यरत आहेत. सोनाली हिंगे या पोलिस दामिनी मार्शल असून शिवाजीनगर पोलिस स्टेशन येथे कार्यरत असून त्या प्रसिद्ध रील स्टार आहेत. तसेच सुदाम तायडे यांची शिवाजीनगर पोलिस स्टेशन येथे नेमणूक करण्यात आली आहे.

पुण्यातील एका शैक्षणिक संस्थेच्या महिला प्राचार्याला या तिघांनी संगनमताने जाळ्यात ओढले. तुमच्यावर ‘पॉक्सो’ (बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा) अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल होऊ शकतो आणि तुम्हाला अटक केली जाईल, अशी भीती या पोलिसांनी दाखवली. पोलिस असल्याचे सांगून कायदेशीर कारवाईची दहशत निर्माण केली आणि प्रकरण मिटवण्यासाठी 7 लाख रुपयांची मागणी केली. अटकेच्या आणि बदनामीच्या भीतीने पीडित प्राचार्यांनी ही रक्कम या पोलिसांना दिली. मात्र, हा सर्व प्रकार संशयास्पद वाटल्याने त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे धाव घेतली.
पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे ही तक्रार प्राप्त होताच, त्यांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिले. प्राथमिक चौकशीत पोलिसांचा सहभाग स्पष्ट झाल्यानंतर पोलिस आयुक्तांनी कडक भूमिका घेत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. दरम्यान, या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.










