
पुणे जिल्ह्यातील औद्योगिक केंद्र असलेल्या चाकण परिसरात गुन्हेगारांनी धुमाकूळ घातला आहे. वासुली गावच्या हद्दीतील ‘अमेझॉन’ कंपनीच्या गेटसमोरून एका तरुणाचे अपहरण करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह एकूण 7 जणांवर कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,ऋषिकेश दिलीप कल्हाटकर (२६) हा तरुण वासुली येथील अमेझॉन कंपनीच्या गेटसमोर उभा असताना हा सर्व प्रकार घडला.जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी लाल रंगाची कार आणि नेक्सॉन कारमधून तिथे येत ऋषिकेश कल्हाटकर याला जबरदस्तीने गाडीत कोंबले.त्याला अज्ञात स्थळी पळवून नेत असताना जीवे मारण्याच्या उद्देशाने बेदम मारहाण करण्यात आली.औद्योगिक पट्ट्यात भररस्त्यात घडणाऱ्या या गुन्हेगारी घटनेमुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी सागर बाळू जावळे,नितीन संजय शिटे,सौरभ अनिल ढोरे,अजय भरत गोपाळे, कुणाल प्रशांत चव्हाण आणि ओमकार यमराज कोरडे यांना अटक केली आहे.तसेच या गुन्ह्यात सामील असलेल्या एका अल्पवयीन मुलाला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींवर भारतीय न्याय संहिता २०२३ (BNS)चे कलम १८९(२),१९१(२), १९०, ११५(२), ११८(१), १०९, १०५ आणि ३(५) यांसारख्या अत्यंत गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.










