
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. त्याच्याविरोधात एकूण १५ गुन्हे दाखल आहेत. आज तिसऱ्या गुन्ह्यात त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने त्याला सात दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. आता पुन्हा एसआयटीकडून चौथ्या गुन्ह्यात त्याचा ताबा मागितला आहे. त्यामुळे अशोक खरातसमोरील अडचणी कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत.

दरम्यान, अशोक खरातशी संबंधित असणाऱ्या व्यक्ती देखील तपास यंत्रणांच्या रडारवर आल्या आहेत. यात चाकणकर भगिनींचा देखील समावेश आहे. या प्रकरणी आधीच रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. यानंतर आता रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांना शिर्डी पोलिसांनी चौकशीसाठी बोलवलं आहे. मागील वर्षभरात प्रतिभा चाकणकर यांनी खरातला तब्बल २३६ कॉल केल्याचं समोर आलं होतं.

मागील चार तासांपासून शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकर यांची चौकशी सुरू आहे. अशोक खरात बनावट बँक खात्यांच्या प्रकरणात त्यांची चौकशी आहे. अशोक खरातशी संबंधित असलेल्या समता पतसंस्थेत प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावे एकूण चार खाती आहेत. यात प्रतिभा चाकणकर यांचे दोन तर त्यांच्या दोन मुलांच्या नावाने दोन खाती या बँकेत आहेत. या चारही खात्यांना अशोक खरात नॉमिनी असल्याची माहिती आहेत.
चाकणकर भगिनींनतर आता चाकणकर कुटुंबातील तिसरी व्यक्ती पोलिसांच्या रडारवर आली आहे. शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकर यांचा मुलगा तन्मय याचा जबाब नोंदवून घेतला जात आहे. मागील चार तासांपासून दोघंही शिर्डी पोलीस ठाण्यात आहेत. चाकणकर कुटुंबाच्या चार खात्यांवरून 2 कोटी 40 लाखांचा व्यवहार झाल्याची माहिती आहे. याच व्यवहाराबाबत दोघांची चौकशी सुरू आहे.










