
भरधाव टँकर चालकाने दिलेल्या धडकेत १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी (दि. ५) संध्याकाळी पाचच्या सुमारास मोहम्मदवाडीतील क्लाउड नाइन परिसरात घडला. आरिफ शेख (वय १९) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी टँकर चालक रवींद्र भीमराव दनाने (वय ३४) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार आरिफ शेख हा रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास मोहम्मदवाडी परिसरातून जात होता. त्यावेळी भरधाव टँकर चालक रवींद्र दनाने याने दुचाकीला धडक दिली. अपघातात आरिफ गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी टँकर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास काळेपडळ पोलिस करत आहेत. या अपघातानंतर भरधाव वाहनांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.











