
पुणे – अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने एका तरुणाच्या डोक्यात लाकडी स्टिक घातल्याची घटना घडली आहे. ही घटना पुणे सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील श्रीकृष्ण मंगल कार्यालयाच्यासमोर सोमवारी (ता.२६) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

आदित्य कुंजीर असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून डोक्यात दहा टाके पडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तर आरोपी हे अल्पवयीन असून ते सर्व शिंदवणे येथील रहिवाशी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य कुंजीर हा उरुळी कांचन येथील एका नामवंत शैक्षणिक संकुलात पदवीच्या दुसऱ्या वर्गात शिक्षण घेत आहे. आदित्य हा रस्त्याने जात असताना शिंदवणे येथील ७ ते ८ अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने त्याला अडविले. त्यावेळी त्याच्यामध्ये शब्धिक बाचाबाची झाली. त्यानंतर अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने आदित्य ला शिवीगाळ करून बेदम मारहाण केली.

या मारहाणीत आदित्यच्या डोक्यात लाकडी स्टिक लागल्याने तो गंभीर जखमी झाला. व त्याच्या डोक्यातून रक्तस्त्राव वाहू लागला. त्यानंतर त्याला सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थित असून त्याच्या डोक्यात दहा टाके पडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.









