
आरक्षणाचा आणखी एक बळी, मराठा आरक्षण मिळत नसल्याने उचलले टोकाचे पाऊल

जालना – उच्चशिक्षित असूनही शासकीय नोकरी मिळत नसल्याच्या नैराश्यातून २५ वर्षीय तरुणीने गळफास घेत जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. राणी साहेबराव नाईकवाडे असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

राणी साहेबराव नाईकवाडे असे मृत तरुणीचे नाव आहे. राणी ही विज्ञान शाखेची पदवीधर होती. तिने काही स्पर्धा परीक्षा दिल्या होत्या. आरक्षण नसल्याने शासकीय नोकरी मिळत नाही. या विवंचनेत तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिला पुणे येथे एका खासगी कंपनीत जॉब मिळाला होता. राणी ही काही दिवसांपूर्वी पुणे येथून बदनापूरला आई-वडिलांकडे आली होती. गावाकडे आल्यावर तिने हे टोकाचेपाऊल उचलले. राणीचे आई-वडील हे हलाखीचे जीवन जगत आहेत. पण मुलीचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी मजुरी करून तिला पैसे पुरवत होते. चार वर्षांपूर्वी राणीच्या वडिलांचे कॅन्सरचे ऑपरेशन झाले होते. अशा परिस्थितीत देखील राणीने न डगमगता आपले शिक्षण पूर्ण केले होते. जर मला आरक्षण मिळाले असते तर मला नोकरी मिळाली असती अशी खंच तिने आई-वडिलांना देखील बोलून दाखवली होती. त्यानंतर तिने हे टोकाचे पाऊल उचलले आहे.
स्पर्धा परीक्षेत गुणवत्ता असूनही नोकरी लागत नसल्याने ती खचली होती. मृत राणी नाईकवाडे हिच्या पश्चात आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची आहे.









