यशश्री शिंदे हत्याकांड ; दाऊद आणि यशश्री मित्र होते? पोलिसांनी केले महत्वाचे खुलासे

यशश्री शिंदे हत्या प्रकरणातील आरोपी दाऊद शेख याला अटक करण्यात आली आहे. मुंबईच्या क्राईम ब्रांचने  कर्नाटकातील गुलबर्गा येथून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. दाऊद शेख व्यतिरिक्त पोलिसांनी मोहसिन नावाच्या तरुणाला अटक केली आहे. दरम्यान याबाबत पोलिसांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. तसेच अनेक खुलासेही पोलिसांनी केले आहेत.

अतिरिक्त पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांनी सांगितले की, यशश्री शिंदे हिची हत्या झाल्यानंतर आजचा पाचवा दिवस आहे. आम्ही आरोपीला शोधण्यासाठी त्याचा मित्रपरिवार, स्थानिकांची मदत घेतली. त्याआधारे आमचा तीन-चार जणांवर संशय होता. त्याआधारे आमचा तपास सुरु होता. पोलिसांची पथके नवी मुंबई आणि कर्नाटकमध्ये होती. दोन पोलीस पथके कर्नाटकमध्ये तळ ठोकून होती. आम्ही त्यांना इकडून इनपुट्स देत होतो. त्याआधारे आम्ही आज सकाळी मुख्य आरोपी दाऊद शेखला ताब्यात घेतले, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. यशश्री शिंदे हिच्या हत्येनंतर आम्हाला दाऊद शेख याचे नेमके लोकेशन सापडत नव्हते. तो कर्नाटकमध्ये राहतो, एवढीच माहिती आमच्याकडे होती. त्याआधारे आम्ही दाऊद शेखच्या नातेवाईकां पर्यंत पोहोचलो. दाऊदच्या एका मित्राने दिलेल्या माहितीच्या आधारे आम्ही कर्नाटकमधील अल्लर गावातून त्याला ताब्यात घेतले, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणातील मोहसिन हा संशयितही यशश्रीच्या संपर्कात होता. आम्ही त्याची देखील चौकशी केल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात तीन-चार संशयित होते. आम्हाला कोणताही अँगल सोडायचा नव्हता, असे पोलिसांनी म्हंटले.

यशश्रीच्या हत्येची कबुली आरोपी दाऊद शेख ने दिली असल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली. कर्नाटकातून पोलिसांनी दाऊद शेखला ताब्यात घेऊन चौकशी केली असता यशश्रीच्या हत्येची कबुली त्याने दिली. यशश्री शिंदे आणि दाऊद शेख यांची पूर्वी ओळख होती. दाऊद शेख आणि हत्या झालेल्या तरुणीमध्ये मैत्री होती. ते दोघे एकमेकांना ओळखत होते. दोघांमध्ये वाद झाला आणि त्याच्यामधून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, असं पोलिसांनी म्हटलं आहे.

दाऊद आणि यशश्रीमध्ये मैत्री होती, मात्र त्यांच्यामध्ये दोन ते तीन वर्षांपासून कोणताही संपर्क नव्हता. हा किडनॅपिंगचा प्रकार नव्हता तर त्या दोघांनी एका जागी भेटायचं ठरवलं, मात्र त्यांच्यात वाद झाला आणि या वादातून हे हत्याकांड झाल्याचा अंदाज आहे, असं पोलिसांनी म्हटलं आहे. आरोपीनं ठरवून हत्या केल्याचं देखील तपासात समोर आल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. आमची चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही. इतक्यात कोणताही निष्कर्ष काढता येणार नाही, असेही पोलिसांनी सांगितले.