पुणे जिल्ह्यातील गुंजवणी सिंचन प्रकल्पाच्या कामास गती द्यावी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश, येत्या दोन वर्षात काम पूर्ण करण्याच्या सुचना

मुंबई – पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यातील महत्त्वाच्या अशा गुंजवणी सिंचन प्रकल्पामुळे परिसरातील गावांना पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कामास गती देऊन हे काम येत्या दोन वर्षात पूर्ण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यातील (वेल्हा) गुंजवणी सिंचन प्रकल्पाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनातील मंत्रिमंडळ सभागृहातील बैठकीत आढावा घेतला. गुंजवणी सिंचन प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेऊन मुख्यमंत्री म्हणाले की, या प्रकल्पासाठी लागणारा निधीची कमतरता भासणार नाही. या प्रकल्पाच्या तिसऱ्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव राज्य तांत्रिक सल्लागार समितीने 20 दिवसांत छाननी करून पाठवावा. या प्रकल्पामुळे 16 गावांना समान पाणी वाटप उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे काम तातडीने पूर्ण करण्याची कार्यवाही करावी. यावेळी आमदार शिवतारे यांनी गुंजवणी सिंचन प्रकल्प वेगाने पूर्ण करणे आवश्यक असल्याचे सांगून यासाठी आवश्यक निधी देण्याची मागणी केली. दरम्यान गुंजवणी जलसिंचन योजनेच्या बंदिस्त जलवाहिनीचे काम १९९३ च्या जुन्या सर्वेप्रमाणे करण्याची मागणी सोळा गावांतील शेतकऱ्यांची असून त्याप्रमाणे काम करण्यात यावे, अशी मागणी माजी आमदार संजय जगताप यांनी केली होती. कालवा पद्धतीने पाणी देण्याच्या पारंपरिक पद्धतीपेक्षा बंद पाइप पद्धतीने खर्चात व पाणी वापरात मोठी बचत होणे अपेक्षित असल्याने केंद्राने धोरण ठरवून या प्रकल्पास प्रथमच मान्यता दिली. त्यामुळे या तिन्ही तालुक्यांना आता शेती, पिण्याचे-उद्योगाचे पाणी बारमाही पद्धतीने उपलब्ध होणार आहे.

यावेळी जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार विजय शिवतारे, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव संजय बेलसरे, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले आदी उपस्थित होते.