भाजप नेते प्रदीप कंद यांच्यासह ११ जणांची माघार ; शिरुर हवेलीच्या मैदानात होणार अशोक पवार विरुद्ध ज्ञानेश्वर कटके अशी मुख्य लढत

हवेली प्रतिनिधी – गौरव कवडे | महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ची रणधुमाळी सुरु झाली आहे. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीत यांच्यात मुख्य लढत होत आहे. येत्या २० नोव्हेंबरला मतदान पार पडणार असून २३ नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. तर आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता. पुणे जिल्ह्यातील शिरूर -हवेली मतदारसंघातून भाजपचे नेते आणि जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद यांच्यासह अकरा जणांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता आमदार अशोक पवार विरुद्ध ज्ञानेश्वर कटके अशी मुख्य लढत होणार आहे.

भाजप नेते प्रदीप कंद यांना देवेंद्र फडणवीस यांनी चांगल्या पदावर संधी देऊन भाजपच्या कार्यकर्त्यांना योग्य न्याय देण्याची ग्वाही दिल्यामुळे कंद यांनी तलवार मान्य केली आहे. शिरुर हवेलीच्या मैदानातून प्रदीप कंद यांनी तिसऱ्यांदा माघार घेतली आहे. कंद यांच्याबरोबरच कटके मनिषा ज्ञानेश्वर, शिवाजी ज्ञानदेव कदम, प्रकाश सुखदेव जमधडे, सुरेश लहानु वाळके, जगदीश भागचंद पाचर्णे, भाऊसाहेब बाळासाहेब जाधव, पंढरीनाथ मल्हारी गोरडे, शांताराम रंगनाथ कटके, शिवाजी किसन कुऱ्हाडे, दाभाडे गणेश कुंडलिक यांनी देखील माघार घेतली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी संगीता राजापूरकर यांनी सांगितले.