दिल्ली विधानसभेत ‘हा’ पक्ष बहुमताने सत्ता स्थापन करणार?

आप आणि भाजपात चुरशीची लढत, काँग्रेस चमत्कार घडवणार? फलोदीचा धक्कादायक अंदाज समोर

दिल्ली – दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 साठी निवडणुकीच्या प्रचारतोफा ३ फेब्रुवारी रोजी थंडावल्या आहेत. प्रचंड आरोप प्रत्यारोपांनंतर सोमवारी संध्याकाळी ५ वाजता दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार थांबला आहे. आता उद्या विधानसभेसाठी मतदान होणार असून ८ तारखेला विधानसभेचा निकाल लागणार आहे.

दोन वेळा सत्ता स्थापन केल्यानंतर तिसऱ्यांदा सत्ता स्थापनेच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या आपचा यंदा भाजपाचे मोठे आव्हान आहे. तर काँग्रेसला यंदा पुनरागमन करण्याचा विश्वास आहे. त्यातच आता फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज समोर आला आहे. फलोदी सट्टाबाजाराने दिल्लीतील ७० जागांचा अंदाज व्यक्त केला असून आप हा पक्ष सत्ता स्थापनेची हॅट्रीक पूर्ण करेल असा विश्वास आहे. या निवडणुकीत आपला ३८ ते ४० जागा मिळतील असा अंदाज आहे. भाजपाला या निवडणुकीत २५ ते ३५ जागा येतील तर दुसऱ्या बाजूला कॉंग्रेसला फक्त तीन जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विधानसभेच्या एकूण ७० जागा असून बहुमतासाठी ३६ आकडा आहे. आपचा सामना कॉंग्रेस आणि भाजपशी होणार आहे. त्यामुळे तिन्ही प्रमुख पक्षांनी यासाठी जोरदार तयारी केली असून यामध्ये कोण बाजी मारणार ? त्याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे. त्यामुळे आता वेगवेगळे अंदाज व्यक्त होत असले तरीही ८ तारखेला चित्र स्पष्ट होणार आहे.

फलोदी सट्टाबाजार हा नावाप्रमाणेच एक सट्टाबाजार आहे. हा सट्टाबाजार यापूर्वी क्रिकेटमध्ये गुंतलेला होता. मात्र आता तो राजकीय रिंगणातही उतरला आहे. महाराष्ट्रातही परत महायुतीची सत्ता येईल, असा अंदाज फलोदी सट्टा बाजाराने वर्तवला होता.