
कार्यकर्त्यांशी चर्चा करून घेणार निर्णय, काँग्रेसकडून खच्चीकरण झाल्याचा आरोप, या पक्षात जाणार?

पुणे – पुण्याच्या राजकारणामध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. रवींद्र धंगेकर यांनी याबाबत सूचक विधान केले आहे. एका वाहिनीशी संवाद साधताना माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी त्यांच्या पक्षांतरबाबत प्रतिक्रिया दिली आहे. तसेच काँग्रेसवर टिका देखील केली आहे.

रवींद्र धंगेकर आता शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली. त्याचबरोबर रवींद्र धंगेकर यांनी भगव्या उपरणासह फोटो टाकल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. धंगेकरांच्या या स्टेटसची संपूर्ण राज्यामध्ये चर्चा होत होती. यावर बोलताना धंगेकर म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी शिवजंयती होती. यानिमित्ताने मी सर्व शिवभक्तांसाठी एक छोटा कार्यक्रम ठेवला होता. त्यावेळी वेगवेगळे कार्यकर्ते उपस्थित होते. मी मला जे स्टेटस आवडतात ते स्टेटसला ठेवत असतो. एखाद्या सर्वसामान्याने केलेले फोटो किंवा रिलही मी स्टेटसला ठेवतो. माझा तो फोटो खूप चांगला आला होता. मला तो आवडला. त्यामुळे मी टाकला. प्रसारमाध्यमांनी त्यावर चर्चा केल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी जुने शिवजयंतीचे फोटो टाकायला लागले. यानंतर मग मी शिवसेनेत जाणार अशा चर्चा रंगल्या. हा रिल टाकायचा माझ्या डोक्यातला विषय नाही. बऱ्याच दिवसांनी माझा चांगला फोटो आला त्यामुळे टाकला, असे मत माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी मांडले आहे. शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याबाबत ते म्हणाले की, मी कार्यकर्त्यांसोबत बोलतो. जाताना मी लपून जाणार नाही. मला आवडलं म्हणून मी फोटो टाकलो. मी शिवसेनेत चाललो अशी परिस्थिती निर्माण झाली. उदय सामंत माझे मित्र आहेत. अजितदादा यांच्यासोबतही चांगले संबंध आहेत. आपला जन्म भगव्या उपरणातच झाला आहे. मी हिंदू धर्मात जन्मलो आहे. आपला मित्र आपल्यासोबत असावा, असे अनेकांना वाटतं. ऑफर देण्यात काहीही चूक नाही, अशी स्पष्ट भूमिका धंगेकर यांनी मांडली आहे, तसेच पण मागील काही दिवसात राजकीय वर्तुळात जे काही सुरू आहे. त्याबाबत मी येत्या दोन दिवसात माझ्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यामुळे काँग्रेस पक्षात अस्वस्था वाढली आहे.

काँग्रेसच्या नाराजीवर बोलताना म्हणाले, जे दोन तीन दिवस सुरु आहे. त्याबाबत मी कार्यकर्त्यांशी बोलणार आहे. काय अडचणी आहेत ते जाणून घेणार आहे. कार्यकर्त्यांचे खच्चीकरण झाल ही वस्तुस्थिती आहे. असं सांगत अनेकांना पद हवी आहेत. सर्वांना ताकद देण्यासाठी आता आपण पुढे झालं पाहिजं असं धंगेकर यावेळी म्हणाले आहेत.









