
दिल्ली – लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वातील एनडीएने सत्ता स्थापन केली आहे. मात्र २०१४ आणि २०१९ मधील असलेला बहुमताचा आकडा भाजपाकडे नाही. त्यामुळे भाजपाला मोठे निर्णय घेताना अनेकदा अडचणी येत आहेत. त्यामुळे भाजपा आपले बहुमत वाढवण्याकडे लक्ष देत आहे. त्यामुळे आगामी काळात कोणता पक्ष फुटणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

भाजपासाठी आजघडीला चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार या दोघांच्या निर्णयावर अवलंबून रहावे लागत आहे. पण हे दोन्ही पक्ष बेभरवशाचे आहेत. त्यामुळे बेभरवशाच्या मित्रपक्षांच्या आधारे सरकार टिकवण्याऐवजी आपले किंवा विश्वासू मित्रपक्षांचे बळ वाढवण्याकडे भाजपने लक्ष केंद्रीत केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना ठाकरे आणि पवार यांचे १/३ खासदार फोडण्याचे टार्गेट देण्यात आले आहे. शरद पवार गटाचे ८ आणि उद्धव ठाकरे गटाचे ९ खासदार यांच्यावर भाजपाची नजर आहे. सर्व खासदार सोबत येतील किंवा एक तृतीयांश खासदार फोडले जातील असा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. त्यातूनच काल सुनिल तटकरे यांनी पवार गटाच्या ७ खासदारांना संपर्क साधला होता. पण दिल्ली विधानसभेत यश मिळाल्यास इतर पक्षातील खासदार स्वतः आपल्याकडे येतील अशी आशा भाजपाला आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले आहे. त्यामुळे आता भाजपकडून आक्रमक पवित्रा घेतला जात असल्याची चर्चा दिल्लीच्या वर्तुळात आहे. त्यामुळे पुढचा राजकीय भूकंप कधी होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

भाजपाचं २४० खासदारांच्या पाठिंब्याने अल्पमतात सरकार बनले आहे. चंद्राबाबू नायडू १६ आणि नितीश कुमार यांचे १२ खासदार यावर केंद्र सरकार टिकून आहे. या दोन्ही नेत्यांवर अवलंबून राहणे सोडण्यासाठी भाजपाकडून ऑपरेशन २७२ चे प्लॅनिंग केले जात आहे.









