हडपसर मतदारसंघात पुन्हा मतांची फेर मोजणी होणार ? शरद पवार गटाचे उमेदवार प्रशांत जगताप यांची मागणी

पुणे शहरातील सर्वात मोठा मतदार संघ अशी ओळख असलेल्या हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी (अजित पवार) विरुद्ध राष्ट्रवादी (शरद पवार) अशी लढत आहे. अजित पवार यांनी ते मला आमदार चेतन तुपे यांना तर शरद पवार यांनी माजी महापौर प्रशांत जगताप यांना उमेदवारी दिली होती.या मतदारसंघातील मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या फेरीपासून विद्यमान आमदार चेतन तुपे यांनी आघाडी घेतली होती.

बाराव्या आणि तेराव्या फेरीपर्यंत तुपे यांनी आघाडी कायम ठेवली होती. त्यानंतर त्यांचे मताधिक्य कमी करत राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे उमेदवार प्रशांत जगताप यांनी मताधिक्य घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर या दोन्ही उमेदवारांमध्ये जोरदार चुरस सुरू होती.अखेरच्या फेरीमध्ये चेतन तुपे यांनी आघाडी घेत सहा हजार मते प्रतिस्पर्धी उमेदवार प्रशांत जगताप यांच्यापेक्षा अधिक मिळविली. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निकाल जाहीर केल्यानंतर यावर आक्षेप घेत प्रशांत जगताप यांनी या मतदार संघातील मतांची फेर मोजणी करण्याची मागणी केली आहे. ही मते आम्हाला मान्य नाही, मतमोजणी मध्ये काही गोंधळ झाल्याचे सांगत पुन्हा मतांची मोजणी करण्याची मागणी जगताप यांनी केली.

हडपसर मतदार संघ हा महायुतीच्या जागा वाटपामध्ये अजित पवार यांच्या वाट्याला आला आहे. या मतदारसंघातून शिवसेना (शिंदे) पक्षाचे शहर प्रमुख नाना भानगिरे इच्छुक होते. मात्र हा मतदारसंघ सोडणार नसल्याची भूमिका घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्यमान आमदार चेतन तुपे यांनाच येथून उमेदवारी दिली. तर महाविकास आघाडीने राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला ही जागा दिली होती. शिवसेना (ठाकरे) पक्षाकडून माजी आमदार महादेव बाबर यांनी जोरदार तयारी केली होती. मात्र ही जागा राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला दिल्याने ते नाराज झाले होते. या भागातील शिवसैनिक गंगाधर बधे यांनी बंडखोरीकर अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. माजी आमदार बाबर यांनी बधे यांना पाठिंबा देत त्यांचा प्रचार केला. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या मतांचे विभाजन झाले, अशी चर्चा सुरू झाली आहे.