
महाराष्ट्रातील नेत्यासह ‘ही’ चार नावे चर्चेत, नड्डानी केला मोठा विक्रम, संघाची मात्र ‘या’ नावाला पसंती?

दिल्ली – भाजपचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष याच आठवड्यात ठरण्याची शक्यता आहे. पक्षाच्या स्थापना दिनाआधी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष जाहीर करण्यावर भाजपचा भर असल्याची माहिती समोर आली आहे. या पदासाठी सध्या चार नावे चर्चेत आहेत.

भाजप अध्यक्षपदासाठी भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान, विनोद तावडे, डी पुरंदरेश्वरी यांची नावं आघाडीवर असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. आता यामधील भाजपच्या अध्यक्षपदी कुणाच्या नावाची वर्णी लागणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. भाजपच्या नव्या अध्यक्षाबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे. संघटनात्मक नाव नोंदणी पूर्ण झाल्याने अध्यक्षांचं नाव आता जाहीर होणार आहे. बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि गुजरातसह अनेक राज्यांमध्ये काही दिवसातच निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहमतीनंतरच अध्यक्षपदाची घोषणा होणार आहे. जून २०१९ मध्ये जे. पी नड्डा भाजपचे कार्यकारी अध्यक्ष आणि जानेवारी २०२० मध्ये पूर्णवेळ अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले हेाते, पण आता ते केंद्रात मंत्री झाल्यामुळे पक्ष नवीन अध्यक्ष निवडणार आहे. जे. पी. नड्डा यांनी भाजपाला लोकसभा आणि विधानसभा अशा २६ निवडणुकांमध्ये विजय मिळवून नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.
येत्या ६ एप्रिलला भाजपाचा स्थापना दिवस आहे. त्यामुळे या दिवशी भाजपच्या नव्या अध्यक्षाचे नाव जाहीर करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड का लांबते आहे याचं ठोस कारण अद्याप समोर आलेले नाही.









