लोकसभा निवडणुकीत महायुतीचा पराभव झाला तर महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले. या निकालानंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलतांना दिसत आहे. महायुतीतील अजित पवार गटाला फक्त एक जागा मिळाल्यानंतर अजित पवार गटातील आमदार खासदार आता शरद पवार गटात जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
चर्चांवर माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी मोठा गोप्यस्फोट केला आहे. अनिल देशमुख माध्यमांशी बोलतांना म्हणाले,’लोकसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर आम्हाला सोडून गेलेल्या आमदारामध्ये मोठ्या प्रमाणत चुळबूळ सुरू झाली आहे. त्यामुळे आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह आम्हा अनेकांना त्यांचे फोन येत आहेत. त्यामुळे पक्षाची काय भूमिका आहे हे लक्षात घेऊन पुढील काळात त्यांच्याबाबत निर्णय घेण्यात येतील.’ असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे.
दरम्यान लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपसह महायुतीचा महाविकास आघाडीने धुव्वा उडवला. यामध्ये भाजपची 9 जागांवर घसरण झाली, शिंदेच्या शिवसेनेला 7 जागा मिळाल्या तर सर्वाधिक फटका अजित पवार यांच्या राष्ट्रावादीला बसला. कारण या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. यामुळे आता लोकसभेतील या अपयशानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमधील आमदारांमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या राजकीय भविष्याबाबत असुरक्षितता निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे.