राज्यातील लाडक्या बहीणींवर सरकार गुन्हे दाखल करणार?

लाडक्या बहिणी झाल्या दोडक्या, बोगस लाडक्या बहीणींविरोधात सरकार आक्रमक, पुन्हा होणार सर्वेक्षण

मुंबई – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना आणि मुलींना आत्मनिर्भर आणि स्वावलंबी करण्याचे सरकारचे ध्येय आहे. या योजनेमार्फत पात्र महिलांच्या खात्यात दरमहा १५०० हजार रूपये देण्यात येतात. पण आता सरकार लाडक्या बहिणींवर गुन्हा दाखल करणार आहे.

बनावट कागदपत्रांच्या आधारे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या काही लाडक्या बहिणींवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यामुळे बहिणींमध्ये भीतीचे वातावरण आहे. खोटी कागदपत्रे, घरात चारचाकी आणि नियमापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असताना सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्यांवर आता गुन्हे दाखल होत आहेत. त्यामुळे महिलांमध्ये एकच भीती निर्माण झाली आहे. तटकरे यांनी ट्वीट करत म्हटले की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत बनावट लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचा गैरप्रकार हा स्थानिक अंगणवाडी सेविकांच्या सजगतेमुळे अर्ज पडताळणीच्या वेळी सप्टेंबर महिन्यातच निदर्शनास आला आहे. याबाबत ४ ऑक्टोबर रोजी पोलिसांत रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर बनावट अर्जदारांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकदाही सन्मान निधी वितरित झाला नसून, सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. महिला व बालविकास विभाग अर्जदारांच्या छाननीबाबत अत्यंत सजग असून कोणत्याही प्रकारची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका आणि बालविकास प्रकल्प अधिकारी महिलांच्या घरी जाऊन पडताळणी करणार आहेत. चारचाकी वाहन असलेल्या अर्जदारांची नावे योजनेतून बाद होणार आहेत.

लाडकी बहीण योजनेची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत सात हप्त्यांचे एकूण १०,५०० रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता १५ तारखेनंतर वितरीत होणार आहे. त्यामुळे पात्र लाडक्या बहिणींना १५ तारखेनंतर आठवा हप्ता मिळणार आहे.