सरकारच्या त्या निर्णयामुळे तळीरामांचे हाल होणार?

गटारी जवळ आली असताना अडचणी वाढल्या, गटारी कशी साजरी होणार, नेमके काय घडले?

मुंबई – श्रावण महिना जवळ आल्यानंतर सगळ्यात आधी तळीरामांना आणि मांसाहारप्रेमींना उत्सुकता असते. पण आता त्यांच्यासाठी एक वाईट बातमी आहे. कारण तळीरामांना आता मद्य मिळणे अवघड होणार आहे.

परवानाधारक हॉटेल आणि रेस्टॉरंट उद्योगावर राज्य सरकारने लादलेल्या अन्यायकारक करवाढीच्या विरोधात येत्या १४ जुलै रोजी राज्यभरातील २०,००० हून अधिक हॉटेल आणि रेस्टॉरंट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. “संपूर्ण हॉस्पिटॅलिटी उद्योग मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जात आहे. आमच्या विनवण्या सरकारने अक्षरशः दुर्लक्षित केल्या. १४ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील परवानाधारक हॉटेल आणि रेस्टॉरंट बंद राहतील. हा सरकारच्या दंडात्मक कर व्यवस्थेचा निषेध आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि कोकणातील आमचे सर्व सदस्य या बंदमध्ये सहभागी होणार आहेत.” असे आहाराचे अध्यक्ष सुधाकर शेट्टी म्हणाले आहेत. २०,००० हून अधिक परवानाधारक हॉटेल आणि रेस्टॉरंट अप्रत्यक्षरीत्या सुमारे २० लाख लोकांना रोजगार देतात. तसेच सुमारे ४८,००० पुरवठादार या क्षेत्रावर अवलंबून आहेत, असे असतानाही राज्य सरकार मात्र उद्योग संपवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, अशी टीका सुधाकर शेट्टी यांनी केली. दरम्यान बार मालकांनी संप पुकारल्यास, राज्याच्या महसुलावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे मद्यप्रेमींची गैरसोय होण्याची शक्यता आहे. या संपामुळे मद्यप्रेमींना बारमध्ये जाणे कठीण होऊ शकते. आता सरकार यावर तोडगा काढणार का संप होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मद्यावरील मूल्यवर्धित कर (व्हॅट ) ५% वरून १०% इतका दुप्पट करण्यात आला. वार्षिक परवाना शुल्कात १५% वाढ करण्यात आली. उत्पादन शुल्कात तब्बल ६०% वाढ करण्यात आली आहे. वर्षभरातच या तिप्पट करवाढीमुळे संपूर्ण उद्योग संकटात सापडला असल्याने बंदचा निर्णय घेण्यात आला आहे.