राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ भाजपात प्रवेश करणार?

या कारणामुळे सोडणार घड्याळाची साथ, अजित पवारांवर टिकेचे बाण, राज्यात ओबीसी राजकारण बदलणार?

मुंबई – मंत्रिपदावरून डावलल्यानंतर पक्षाकडूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्यामुळे नाराज असलेल्या छगन भुजबळ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील दरी आता अधिकच वाढली आहे. आता भुजबळ लवकरच भाजपात.प्रवेश करणार आहेत.

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात डावलल्या गेल्यानंतर नाराज असलेल्या भुजबळ यांनी ‘जहाँ नही चैना, वहा नही रहना’ असे जाहीरपणे सांगत राष्ट्रवादीशी काडीमोड घेण्याचे संकेत दिले होते. विधानसभा निवडणुका झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिल्यांदाच शिर्डीत अधिवेशन होत आहे. आजच्या अधिवेशनाला माजी मंत्री छगन भुजबळ दाखल झाले आहे. यावेळी त्यांनी खासदार सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी विनंती केली म्हणून आलो असं सांगितले, अजित पवार यांचा त्यांनी उल्लेख टाळला. भुजबळ अजूनही पक्षावर नाराज असल्याचे बोलले जात आहे. व्यथित झालेल्या भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतली होती. फडणवीस यांनी त्यांना काही काळ थांबण्याचा सल्ला दिला. मात्र, त्यानंतरही भुजबळ यांच्याशी पक्षातर्फे संपर्क साधण्यात आला नाही. एवढचं काय पंतप्रधान मोदींच्या आमदारभेटीच्या बैठकीतही भुजबळ सहभागी झाले नव्हते. पण आज शिर्डीत होणाऱ्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मंत्री छगन भुजबळ पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येणार आहेत. दरम्यान माझी तब्येत ठीक नाही. त्यामुळे मी भाषण करणार नाही”, असे छगन भुजबळांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादीच्या अधिवेशनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह बडे नेते उपस्थित राहणार आहे. १८, १९ जानेवारी असं दोन दिवस पक्षाचे अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनासाठी पक्षाचे ७०० पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.