
मुंबई – राज्यात महायुतीने एकहाती सत्ता हस्तगत केली, तर महाविकास आघाडीचे पानिपत झाले आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपला प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातही शरद पवार गट लवकरच नवीन प्रदेशाध्यक्षाची घोषणा करण्याची शक्यता आहे.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात ८ जानेवारीला शरद पवार गटाची महत्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी शरद पवार स्वत: उपस्थित राहून कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. पण याबरोबरच यावेळी जयंत पाटील यांच्या ऐवजी नव्या प्रदेशाध्यक्षपदाची निवड होण्याची शक्यता आहे. या बैठकीला पक्षाचे आजी-माजी आमदार, खासदार, विधानसभेचे उमेदवार, जिल्हाध्यक्ष, पक्षाच्या विविध आघाडीचे प्रमुख, तालुका अध्यक्ष तसेच प्रदेश पदाधिकारी निमंत्रित आहेत. त्याचबरोबर पक्षात अनेक मोठे बदल होण्याची शक्यता आहे. पक्षात नवीन प्रदेशाध्यक्ष म्हणून रोहित पवार किंवा जितेंद्र आव्हाड यांच्यापैकी एकाची निवड होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पुढील पाच वर्षे मतदारसंघातील विकासकामे होणार नाहीत. मग पुढच्या निवडणुकीला कसे सामोरे जायचे असा प्रश्न काही आमदार खासदारांना पडला आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विलनीकरण करावे आणि संघटन अधिक मजबुत करून पुढची वाटचाल करावी असे अनेकांनी आपले मत व्यक्त केले आहे. दरम्यान राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष पद तीन वर्षासाठी आहे. पण जयंत पाटील सात वर्षापासून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाची होणारी हा मेळावा महत्वाचा ठरण्याची शक्यता आहे.

पक्षाच्या बैठकीत विधानसभा निवडणुका, मतदान यंत्रावरचे आक्षेप, पक्षाच्या पराभूत उमेदवारांनी मतदान यंत्रासंदर्भात उच्च न्यायालयात करायच्या याचिका, सरकारी योजनांचा मतदानांवरील परिणाम आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी यावर दोन दिवसांच्या बैठकीत चर्चा होणार आहे.









