भारतात सोने लवकरच सव्वालाख प्रतितोळा होणार?

‘या’ कारणामुळे वाढत आहेत सोन्याचे भाव, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

मुंबई – सोन्याचे दर रोज नवनवीन उच्चांक गाठत आहेत. त्यामुळे सोने अनेक लोकांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. तर काहीजण गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करत आहेत. आज सोन्याच्या दरात घट झाली असली, तरीही दर चढेच आहेत.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटनुसार, २४ कॅरेट सोन्याचा दर मंगळवारी ९३,३५३ रुपये प्रति १० ग्रॅम होता. यात किंचित घट झाली आहे. बुधवारी सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९३,१०२ झाला आहे. गेल्या आठवड्यात सोने ९६८०० रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत पोहोचलं होते. पुण्यातही २४ कॅरेट सोन्याचा दर ९३,४८० रुपये प्रति तोळा आहे. जागतिक गुंतवणुक बँक असलेल्या गोल्डमन सॅचकडून वर्तवल्या गेलेल्या अंदाजात, जागतिक पातळीवर सुरु असलेल्या व्यापारयुध्दाचे विपरित परिणाम सोन्याच्या भांवांवर होणार असे सांगितले आहे. या अनिश्चिततेमुळे जागतिक बाजारात सोन्याचे भाव प्रति औंस ४५०० डॉलर्सवर जातील. भारतीय रुपयांमध्ये बघितलं तर हीच किंमत १ लाख ३० हजारांवरती जाते. त्यामुळे भारतायांची चिंता वाढू शकते. जागतिक मंदीचा धोकासुध्दा यात वर्तवण्यात आला आहे. यामुळे भारतात सोन्याच्या किंमतींत चांगलीच वाढ होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

जागतिक अर्थव्यवस्था अस्थिर असताना, गुंतवणूकदार सोन्याला सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहत आहेत. अनेकजण सोन्यात गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे २०२५ मध्ये सोन्याच्या दरात २३ टक्के वाढ झाली आहे. एकीकडे शेअर मार्केट ढासळत आहे, त्यामुळे सुद्धा सोने खरेदीत वाढ झाली आहे.