फेब्रुवारीचा हप्ता लाडक्या बहिणींना का मिळाला नाही?

फेब्रुवारीचा हप्ता रखडल्याचे कारण समोर, मार्चमध्ये मिळणार दोन हप्ते, एवढ्या बहिणी अपात्र

मुंबई – लाडकी बहीण योजनाचे फेब्रुवारीचा हप्ता अद्याप मिळाला नाही. २४ फेब्रुवारीपासून तो मिळेल असे सांगितले जात आहे. परंतू, हा हप्ता मिळण्यास अजूनही सुरूवात झालेली नाही. त्यामुळे महिलामध्ये अस्वस्था होती. अखेर पैसे न मिळण्याचे कारण समोर आले आहे.

महिला व बाल विकास विभागाकडून हप्त्याच्या विलंबाबाबत आणि एकूण स्थितीबाबत माहिती देण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यासाठी मिळणारी रक्कम अर्थ खात्याकडून महिला व बालकल्याण खात्याला वर्ग करण्यात आली आहे. परंतू, काही तांत्रिक बाबी निर्माण झाल्याने निश्चित कालावधीत ही रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर वळती करण्यास विलंब झाला आहे. लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकांपूर्वी राबवण्यात आली आहे. जुलै २०२४ पासून जानेवारी २०२५ महिन्यापर्यंत पैसे महिलांना मिळाले आहेत. फेब्रुवारी महिन्यात ८ व्या हप्त्याचे वितरण केले जाणार आहे. फेब्रुवारी महिना हा २८ दिवसांचा आहे. आज २६ तारीख आहे तरीही अजून पैसे खात्यात जमा न झाल्याने अनेक प्रश्न विचारले जात आहेत. लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची पडताळणी झाल्यानंतरच पैसे जमा होतील, असं सांगितलं आहे. त्यामुळे अजूनही पडताळणी पूर्ण झाली नसल्याचे दिसत आहे. यामुळे जेव्हा पडताळणी पूर्ण होईल त्यानंतरच पैसे दिले जातील. या योजनेत फेब्रुवारीचा हप्ता हा मार्च महिन्यातदेखील दिला जाऊ शकतो, असंही सांगितलं जात आहे. दरम्यान लाडकी बहीण योजनेत पैसे लवकर येणार असल्याचे अजित पवारांनी सांगितले होते. मी लाडकी बहीण योजनेच्या चेकवर सही करुन आलोय, असंही त्यांनी एका कार्यक्रमात सांगितलं होतं. परंतु तरीही अजूनही पैसे जमा झालेले नाहीत.

लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणावर छाननी सुरू आहे. या योजनेत सुरू असलेल्या सर्वेक्षणामुळे केवळ दोन महिन्यांत तब्बल 9 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. अद्यापही छाननी प्रक्रियेला थांबवण्यात आले नसल्यामुळे अपात्र महिलांचा आकडा ५० लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.