देशात आता लोकसभा निवडणूक घेतल्यास कोणाची सत्ता येणार?

या संस्थांच्या सर्व्हेमधून धक्कादायक आकडेवारी समोर, पंतप्रधान म्हणून या नेत्याला पसंती, महाराष्ट्रात काय चित्र

दिल्ली – मागील वर्षी जून महिन्यात लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. या निकालात भाजपाला २३९ जागांवरच समाधान मानावे लागले होते, तर काँग्रेसला मोदींचा उदय झाल्यानंतर प्रथमच शंभर जागा मिळाल्या होत्या. पण आता पुन्हा लोकसभा निवडणुका झाल्यास धक्कादायक निकाल लागण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये देशात एनडीएची सत्ता आली, मात्र भाजपला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नव्हती, तर इंडिया आघाडीने २०० पेक्षा अधिक जागा जिंकल्या होत्या. पण आता इंडिया टुडे आणि सी व्होटर्सने केलेल्या सर्व्हेनुसार देशात आता लोकसभा निवडणूका झाल्यास भाजपा एनडीएला ३४३ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. इंडिया आघाडीला १८८ जागा मिळतील असाही अंदाज या सर्व्हेत वर्तवण्यात आला आहे. सर्व्हेनुसार भाजपाला २८१ जागा तर काँग्रेसला फक्त ७८ जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रातही महायुतीला ३९ ते ४० जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला अवघ्या ८ ते ९ जागा मिळण्याची शक्यता आहे. आज लोकसभा निवडणूक झाली तर भाजपला ४०.७टक्के एवढं मतदान होऊ शकतं. तर काँग्रेसला २०.५ टक्के मतदान होण्याची शक्यता आहे. हा सर्व्हे २ जानेवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान करण्यात आला. या सर्व्हे दरम्यान सर्वे ५४३ लोकसभा मतदारसंघातील ५४,४१८ लोकांचे मत जाणून घेण्यात आले. या सर्वेमधून पुन्हा एकदा देशात लोकसभा निवडणूक झाली तर भाजप सत्तेत येऊ शकते, असा कल समोर आला आहे.

सर्व्हेनुसार पंतप्रधान म्हणून ५१ टक्के लोकांनी नरेंद्र मोदींना पसंती दर्शवली आहे. तर २४.९ टक्के लोकांना राहुल गांधींना पंतप्रधान म्हणून पसंती दर्शवली आहे. तर १.२ टक्के लोकांनी अरविंद केजरीवाल यांना पसंती दर्शवली आहे. त्यामुळे मोदी यांचा करिश्मा कायम असल्याचे समोर आले आहे.