(प्रतिनिधी – प्रियंका बनसोडे)- फोनवर बोलत असताना एका तरुणाने घरासमोरून गेलेली विजेची तार पकडल्याने विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना मोशीतील जाधववाडी परिसरात घडली. रामब्रज हरिसिंग तेगोर (वय २२) असे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गणेश जामदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि.११) सकाळी रामब्रज हे फरशी बसविण्याचे काम करण्यासाठी जाधववाडी, मोशी येथे आले होते. सकाळी अकरा वाजताच्या सुमारास रामब्रज यांना फोन आला. फोनवर बोलण्यासाठी ते गॅलरीमध्ये गेले.
या घरासमोरून विजेची तार गेली होती. बोलताना अचानक रामब्रज यांनी विजेची तार हातात पकडली. यामुळे विजेचा जोरदार धक्का बसून ते खाली कोसळले. ते भाजल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. एमआयडीसी भोसरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.